सोमवार, १ जानेवारी, २०१८

हिंदवी परिवाराच्या हिवाळी मोहीमेत राज्यातुन साडेसातशे शिवभक्तांचा सहभाग



शिवभक्तांनी खुली केली शिवकालीन ‘रडतोंडीच्या घाटातली वाट’

वाशीम : हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 23 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित ‘प्रतापगड, मकरंदगड व रायरेश्वर’ या हिवाळी मोहिमेत वाशीम जिल्हयातून 111 जणांसह राज्यभरातुन 750 शिवभक्तांनी सहभाग नोंदविला. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांना मारण्याच्या हेतूने अफजलखान ज्या रडतोंडीच्या घाटातून उतरला होता ती दुर्ग वाट पहिल्यांदाच ‘मास ट्रेकींग’ करिता हिंदवी परिवाराने खुली केली. शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी स्थापलेल्या हिंदवी परिवाराच्या माध्यमातून आचरणकर्ते शिवभक्त घडविण्याच्या उद्देशाने वर्षातून दोनवेळा गडकोटभ्रमंती मोहिमा आयोजित केल्या जातात. या मोहिमांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विविध स्तरातील शिवभक्त सहभागी होत असतात. यंदाच्या या मोहिमेत शेजारच्या कर्नाटक व गुजरात या राज्यातून देखील महाराजांचा इतिहास जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटी शिवभक्त सामील झाले होते.

मोहिमेच्या पहिल्या दिवशी ‘रडतोंडीचा घाट’ उतरुन शिवभक्तांनी प्रतापगडाकडे कूच केली. दुसर्‍या दिवशी मकरंदगड शिवभक्तांनी सर केला तर मोहिमेच्या तिसर्‍या दिवशी रायरेश्वरावर हिंदवी परिवार पोहोचला. ज्या शंभू महादेवाच्या पिंडीसमोर शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तिथेच हिंदवी परिवाराने राष्ट्रबांधणीच्या दृष्टीने व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. तीन दिवसीय या हिवाळी मोहिमेध्ये दुर्गअभ्यासक श्रीकांत कासट (संगमनेर) यांनी प्रत्येक गडकोटांची अभ्यासपूर्ण माहिती शिवभक्तांना दिली. भूगोलासह इतिहास जाणून घेणार्‍या या शिवभक्त मावळ्यांना रोज रात्री शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या तेजस्वी व्याख्यानाची मेजवानी मिळायची. ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ या विषयी सुक्ष्म बारकाव्यांसह आपल्या पहाडी आवाजात डॉ. शेटे यांनी व्याख्यान दिले. या मोहिमेतून प्रचंड शिवऊर्जा व स्फूर्ती घेऊन शिवभक्त परतले. 

360 वर्षापूर्वीचा शिवकालिन दगडी पूल” आकर्षणाचा केंद्रबींदू

प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या पार्वतीपूर (पार) गावापासून जवळच शिवकालीन दगडी पूल आहे. 360 वर्षापूर्वीचा हा वैशिष्ट्यपूर्ण पूल म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमूना मानला जातो. कोकणातील धो-धो पावसानंतर कोयना तुडुंब भरुन वाहताना जवळपास साडेतीन शतकानंतरही हा पूल सुस्थितीत आहे. मात्र पर्यटक आणि अभ्यासकांच्या दृष्टीने हा पूल दुर्लक्षित होता. अनेकदा त्या पूलावरुन ये-जा करताना नागरिकांना हे माहितही नसायचे की आपण शिवकालीन पूलावरुन जातोय, म्हणूनच हिंदवी परिवाराच्या वतीने या पूलाच्या दोन्ही दिशेला फलक लावण्यात आले. या नामफलकाचे उद्घाटन आमदार बच्चूभाऊ कडू व डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. मोहिमेच्या तिसर्‍या दिवशी रायरेश्वर गडावर समारोपाचा कार्यक्रम झाला. त्यात

शिवभक्तांचे मनोगत, हिंदवी परिवाराच्या पदाधिकार्‍यांची नेणूक करण्यात आली. शेवटी वंदेमातरम्ने मोहिमेची सांगता झाली. सूत्रसंचालन श्री. विनायक दुदगी यांनी केले तर आभार डॉ. संभाजी भोसले यांनी मानले. मोहिमेच्या यशस्वीतेकरीता सरनौबत डॉ. संभाजी भोसले (पंढरपूर), गुरुशांत धुत्तरगांवकर (राज्य उपाध्यक्ष), अमोल मोहिते (कार्याध्यक्ष), सिद्धेश्वर टेंगळे, तुकाराम चाबुकस्वार, दत्ता सनके, गजानन केंगनाळकर, वाशिम जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे, कोल्हापूर जिल्हा प्रमुख रामदास पाटील, जळगाव जिल्हाप्रमुख पंकज दुसाने, अकोला जिल्हाप्रमुख भुषण बापट, नगर जिल्हाप्रमुख अमित घाडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

तीन दिवसीय खडतर मोहिमेमध्ये विदर्भातील तीन आमदार सहकुटुंब सामिल झाले होते. त्यामध्ये आमदार बच्चूभाऊ कडू, आमदार बाळूभाऊ धानोरकर आणि माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार सहपरिवार उपस्थित होते. तर विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब दांगडे, डीसीपी सोनाथ घार्गे, मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, उपजिल्हाधिकारी राजळे, बिडचे तहसिलदार देशमुख, अ‍ॅड. किर्तीकुमार शेटे, विकास मनुरकर आदी मान्यवर मंडळी सहभागी झाली होती.

हिंदवी परिवाराच्या वतीने या मोहिमेत साहित्य सह्याद्री उपक्रम राबवण्यात आला. मोहिमेत सहभागी प्रत्येक शिवभक्तांना कोणतेही एक पुस्तक भेट म्हणून आणावयास आणायला सांगीतले होते. या आवाहनाची दखल घेत जवळ जवळ साडेपाचशे पुस्तके जमा झाली होती. हि जमा झालेली पुस्तके या गावातीलच म्हणजे पार गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट म्हणून देण्यात आली. या मोहीमेत वाशीम जिल्हयातून बंडु धामणे, निखिल गोरे, प्रशांत घुगे, दिलीप काळे, शशिकांत गिरी, सौ. लताताई धामणे, कु. लक्ष्मी महाजन, सौ. साधना जाधव, विष्णू गावंडे, निलेश पिंपळे, सदानंद दाभाडकर, किशोर शर्मा, अनिल वाघ, अनिल बामणीकर, डॉ. अश्विन काटेकर, संतोष जाधव, डॉ. देवळे यांच्यासह महाराष्ट्रातुन 750 व जिल्हयातून 111 शिवभक्त सहभागी झाले होते.

साम्रात टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा