· शासकीय चौकशीत प्रथमच गुगल अर्थचा वापर
· संबंधितांवर दंडात्मक, प्रशासकीय कारवाई
वाशिम, दि. १९ : मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व्हे नं. २१५/२ मध्ये असलेल्या ले-आऊट पैकी क्रमांक १० मध्ये एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशान्वये प्रथमच ‘गुगल अर्थ’ (Google Earth) प्रणालीचा वापर करून या प्रकरणाची तपासणी करण्यात आली. यामध्ये सदर प्लॉटवरील बांधकाम हे मार्च २०१७ पूर्वीचे निदर्शनास आले. त्यामुळे मंगरूळपीर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच या प्रकरणाशी संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सुध्दा कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, अकोला यांनी या प्रकरणातील खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे परिशिष्ट अनुच्छेद २५ ब व नोंदणी अधिनियम ३९ ब नुसार प्रतिमाह २ टक्के या प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. तसेच या मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणाशी संबंधित नगरपरिषद कर्मचाऱ्याविरुद्ध मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकीय कारवाई करून त्याची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली आहे. अशा प्रकारच्या चौकशीमध्ये प्रथमच ‘गुगल अर्थ’ सारख्या प्रणालीचा वापर करण्यात आला. त्यामुळे सदर प्लॉटवर झालेल्या बांधकामाची माहिती आधुनिक प्रणालीच्या सहाय्याने घेऊन प्लॉटवर झालेल्या बांधकामाच्या कालावधीची माहिती मिळाली.
मालमत्ता खरेदी-विक्री विहित नियमानुसार करण्याचे आवाहन
कोणत्याही मालमत्तेची खरेदी-विक्री करताना विहित नियमांचे पालन करावे. याप्रकरणी शासनाची कोणत्याही प्रकारची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
सम्राट टाइम्स मीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा