शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

अखेर उकळीपेन येथे विशेष बाब म्हणून प्राथ. आरोग्य केंद्राला मंजूरात



दत्ता सुरदूसे यांच्या पाठपुराव्याला यश 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार 

वाशीम, 19 जानेवारी 

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या उकळीपेन येथे प्राथ. आरोग्य केंद्र नसल्याने या परिसरातील रुग्णांना उपचारासाठी अनसिंग व वाशीम याठिकाणी उपचारासाठी यावे लागत होते. याठिकाणी प्राथ. आरोग्य केंद्र मंजूरात देण्यात यावे, अशी मागणी उकळीपेन येथील भाजपाचे पदाधिकारी दत्ता सुरदूसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून, याठिकाणी प्राथ. आरोग्य केंद्राला मंजूरात दिली. यासाठी आ. लखन मलिक यांनी देखील हिवाळी अधिवेशनादरम्यान याकडे  मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विशेष बाब म्हणून उकळीपेन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. त्याबद्दल आ. लखन मलिक व दत्ता सुरदूसे यांनी त्यांचे आभार मानले. तरुण भारत वृत्तपातुन याबाबत वारंवार बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. 

वाशीम तालुक्यात अनसिंग येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यामुळे तेथील प्राथ आरोग्य केंद्र उकळीपेन येथे देण्याऐवजी वारला याठिकाणी हलविण्यात आली. वास्तविक पाहता उकळीपेन येथे प्राथ आरोग्य केंद्र आवश्यक होते. परंतु, काही राजकीय पदाधिकार्‍यांनी प्रशासनावर दबाव आणून अनसिंगचे प्रा. आ. केंद्र वारला येथे मंजूर करुन घेतले. त्यामुळे उकळीपेन व या अंतर्गत 16 गावातील रुग्णांना उपचारासाठी दुरचा पल्ला गाठुन अनसिंग व वाशीम येथे उपचारासाठी यावे लागत होते. गरोदर माता व अति गंभीर रुग्णांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. उकळीपेन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरात मिळावी यासाठी  भाजपा कार्यकर्ते दत्ता सुरदूसे यांनी भाजपा आ. लखन मलिक यांच्या माध्यमातून सलग तीन वर्ष याचा पाठपुरावा केला. आ. लखन मलिक यांच्या माध्यमातून थेट नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र नस्तीचे आधारावर उकळीपेन प्राथ आरोग्य केंद्र मंजूरीचा अहवाल तयार करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले. 18 जानेवारी 2018 रोजी च्या पत्रान्वये  विशेष बाब म्हणून उकळीपेन येथे आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. याठिकाणी प्रा. आ. केंद्र मंजूर झाल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. लखन मलिक यांचे आभार मानले. तसेच यासाठी पाठपुरावा करणारे दत्ता सुरदूसे यांना धन्यवाद दिले. यासाठी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष शरद चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष बंडू पाटील महाले, उकळीपेन येथील आजी माजी सरपंच यांनी देखील याकामी मोठे सहकार्य केले. 

सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा