*तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ; कारवाई ची मागणी*
भीमा-कोरेगांव येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी विविध सामाजिक संघटना व आंबेडकर अनुयायांनी शहरातील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यादरम्यान कार्यकर्त्यानी अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे कारंजा शहरात दिवसभर कडकडीत बंद होता.
भीमा-कोरेगांव येथे सोमवारी समाजकंटकांनी दलित समाजातील व्यक्तीवर हल्ला करुन वाहनांची जाळपोळ केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ ,इतर सामाजिक संघटना व आंबेडकरी जनता येथील आंबेडकर चौकामध्ये एकत्रित आले. येथून मोर्चा शहरातील जयस्तंभ चौक, नेहरू चौक, नगिना मस्जिद समोरून महात्मा फुले चौक, रामासावजी चौक, दत्त मंदिर चौक, पोहावेश मधून बायपास मार्गे बसस्थानक समोरून अशोक नगरमार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. दरम्यान, तहसील परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ज्यामध्ये अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर सर्वपक्षीय निषेध निवेदन तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. निवेदनामध्ये नमूद केले आहे कि, भिमा कोरेगाव (पुणे) येथील शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव तेथे एकञ झालेले होते. त्यामध्ये सर्वच पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सुध्दा उपस्थित होते.परंतु विकृत प्रवृत्तीच्या काही लोकांनी अनेक दिवसांपासून जाणीवपूर्वक षडयंत्र रचून १ जानेवारीच्या कार्यक्रमावर जो हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करीत आहे.तसेच या घटनेमागे जो " मास्टर माईंड " आहे त्याचा पोलिसांनी आधी शोध घेवून त्याचे नाव जनतेसमोर जाहीर करावे. व या विकृत प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कार्यवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष, बसपा, कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष आदी पक्षातील नेते मंडळी सह बहुसंख्य आंबेडकरवादी नागरिकांची उपस्थिती होती.
*कारंजा कडकडीत बंद*
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा निषेधार्थ आज येथे बंद पाळण्यात आला. प्रशासनाविरुध्द आणि समाज कंटकाच्या विरुध्द घोषणाबाजी केली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समाज बांधवाची मनोगत झाली.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा