प्रतिनिधी | कारंजा (लाड)
कारंजा नगरपरिषदेतील विविध विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी जिल्हाधिकार्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष सभा शुक्रवारी (दि.१९) सकाळी १० वाजता बोलाविण्यात आली असून, पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावडे काम पाहणार आहेत.
नगरपरिषदेची विषय समित्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्यामुळे पुढील एक वर्षा करिता सदस्यांमधून स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, नियोजन विकास समिती, आरोग्य समिती, महिला बालकल्याण समिती आणि शिक्षण समिती यांच्या सदस्यांची संख्या ठरविणे; तसेच समित्यांवर नेमावयाच्या सदस्यांची संख्या ठरविणे याबाबतची विशेष सभा जिल्हाधिकारी वाशीम यांनी दि.१९ जानेवारी रोजी कारंजा नगरपरिषद सभागृहात आयोजित केली आहे. कारंजा नगरपरिषदेमध्ये २८ नगरसेवक निवडून आले असून, 3 सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त झालेले आहेत. त्यामध्ये सत्तारूढ भारिप बहुजन महासंघाचे नगराध्यक्ष व १८ नगरसेवक तसेच सन्मान आघाडीचे ७ नगरसेवक तर भाजप २ व शिवसेना १ असे संख्याबळ आहे. भारिप कडे एकूण १८ व ३ स्वीकृत सदस्य असल्याने सर्व विषय समित्यांवर भारिप चे बहुमत दिसणार असून नगरपरिषदेमध्ये स्पष्ट बहुमत असल्याने मनासारख्या समितीवर वर्णी लावून घेण्यासाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. शिक्षण व बांधकाम या समित्यांवर नियुक्ती होण्यासाठी बहुतेकांचा ओढा आहे. नगरपरिषदेतील विशेष समित्यांच्या सभापतिपदाची नियुक्ती याच वेळी जाहीर होणार आहे.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा