वाशिम, दि. ११ : जलयुक्त शिवार अभियान, जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसहाय्य योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय दि. २ जानेवारी २०१८ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगारांची सहकारी संस्था, नोंदणीकृत गट शेती आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ११ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१८ या कालावधीतhttp://eme.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात अर्ज करणे आवश्यक आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी केले आहे.
जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन संबंधितांना उत्खनन यंत्र सामुग्री (अर्थमुव्हर्स) खरेदी करण्याकरिता वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा कालावधी दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत राहणार आहे. योजनेस मिळणारा प्रतिसाद आणि राज्यात उपलब्ध होणाऱ्या यंत्रांची संख्या विचारात घेऊन या योजनेचा कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यास, संस्थेस बँक अथवा वित्तीय संस्थेकडून उत्खनन यंत्रसामुग्री कर्ज मंजूर करण्यात येईल व अशा कर्जाची कमाल मर्यादा १७ लक्ष ६० हजार रुपये असेल. लाभार्थ्याने स्वतःचा हिस्सा म्हणून किमान २० टक्के रक्कम उभारणे आवश्यक आहे. तसेच ५ वर्षामध्ये शासनामार्फत कमाल व्याज परतावा रक्कम ५ लक्ष ९० हजार रुपये इतकी अनुज्ञेय राहील. १७ लक्ष ६० हजार रुपयेपेक्षा जास्त रकमेवरील व्याजाच्या येणाऱ्या रकमेचा परतावा शासनाकडून अनुज्ञेय नसेल. ही येणारी अतिरिक्त व्याजाची रक्कम अदा करण्याची जबाबदारी ही लाभार्थ्याची असेल. जलसंधारण विभागाकडून करण्यात येणारे जलसंधारण, मृद संधारणाचे उपचार कामांना व पाणंद रस्ते याकरिता उत्खनन यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) आवश्यकता असल्यास या योजने अंतर्गत त्या त्या क्षेत्रातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. या योजनेकरिता वाशिम जिल्ह्यातील लाभार्थी संख्या २५ निश्चित करण्यात आली आहे.
विहित कालावधीत या योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी जिल्हास्तरीय निवड समितीद्वारे केली जाणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य तर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. समितीने पात्र केलेल्या अर्जादारांबाबतची सूची महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ पणे यांना सादर करण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय (कक्ष क्र. १०६, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, काटा रोड, वाशिम) येथे संपर्क साधावा, असे श्री. कटके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा