दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती, पत्रकार दिनानिमित्त आज वाशिम जिल्हा माहिती कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन पगार, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नंदकिशोर नारे, विश्वनाथ राऊत, सुनील मिसर, नंदकिशोर वैद्य, विनोद तायडे, गजानन भोयर, अजय ढवळे, सुनील कांबळे, आतिश देशमुख, विठ्ठल देशमुख, गणेश भालेराव, संदीप पिंपळकर, सुनील पाटील, मंकेश माळी, साजन धाबे, अविनाश भगत, इरफान सय्यद, निलेश सोमाणी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी श्री. अंभोरे म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या पत्रकारितेतून समाजाला नवी दिशा दिली. अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य पत्रकारितेतील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पहिले जाते. देशाच्या विकासात आणि जडणघडणीत पत्रकारितेचे योगादन मोलाचे आहे. यापुढेही प्रत्येक पत्रकाराने हा वैभवशाली वारसा टिकवून ठेवला पाहिजे.
श्री. पगार म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुध्दा आपल्या जवळपास १४ वर्षाच्या पत्रकारितेत सामाजिक जागृतीचे काम केले. हीच परंपरा मराठी पत्रकारितेत आजही सुरु आहे. समाजातील चांगल्या गोष्टींची पाठीशी उभे राहणे आणि वाईट गोष्टी उजेडात आणून त्याला अटकाव करण्याचे काम पत्रकार करतो. त्यामुळे चांगला समाज घडण्यामध्ये पत्रकाराचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग समाजाच्या हितासाठीकरण्याचे काम प्रत्येक पत्रकाराने केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार विनोद तायडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे राजू जाधव, विजय राठोड, प्रमोद राठोड व विश्वनाथ मेरकर यांनी सहकार्य केले.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारीता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मिडीया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखानासाठी पुरस्कार स्पर्धा जाहिर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतीम दिनांक ३१ जानेवारी २०१८ आहे. या स्पर्धेत मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दु या भाषेतील पुरस्कार तसेच सोशल मिडीया पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे राज्यस्तरीय आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी श्री. घोलप यांनी प्रास्ताविकात केले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा