वाशिम, दि. 23 : शेतकऱ्यांना पीकपद्धती तसेच पिकांवर येणारे रोग, किडीविषयी मार्गदर्शन करणे. शेतकऱ्यांपर्यंत कृषि विभागाच्या व शासनाच्या इतर योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर रहावे, असे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, विभागीय कृषि सह संचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डी. एल. जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ फिल्डवर घालवावा. पीक पध्दती, कीड नियंत्रण उपाययोजना, आंतरपीक यासारख्या पद्धतींविषयी मार्गदर्शन करून शेतीमधून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येईल तसेच कीड व इतर रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत राज्य शासन राबवित असेलल्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्याचा प्रयत्न करावा. सध्या कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पंचनामे तातडीने पाठविण्याच्या सूचना श्री. खोत यांनी यावेळी केल्या. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे आदी योजनांचा आढावा घेतला.
जिल्ह्यात नाफेडमार्फत सहा खरेदी केंद्र सुरु आहेत. आधारभूत किंमत खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नाफेडच्या अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना राज्यमंत्री श्री. खोत यांनी यावेळी केल्या. शेतमाल खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारे दिरंगाई अथवा कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जिल्ह्यातील पेयजल योजनांची सद्यस्थिती व पाणीपुरवठा विषयक कामांचाही यावेळी राज्यमंत्री श्री. खोत यांनी आढावा घेतला. तसेच जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण भागात झालेल्या वैयक्तिक शौचालय उभारणीच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत, त्यांचा मेळावा घेऊन संबंधित सरपंच व सदस्यांचा गौरव करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कामरगाव येथे कापूस पिकाची पाहणी
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी अमरावती मार्गे कारंजाकडे येताना कामरगाव येथील शेतकरी धनराज उंटवाल यांच्या शेताला भेट देऊन याठिकाणी कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून कापसावर झालेल्या शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. याप्रसंगी कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तालुका कृषि अधिकारी समाधान धुळधुळे आदी उपस्थित होते.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा