सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

एकाला माना, एकाला जाना आणि एक व्हा - सुनिल बोरकर



वाशीम - देव हा बाजारात मिळण्याची वस्तु नाही. देवाची प्राप्ती करायची असेल तर योग्य संतांची,सद्गुरुची संगत धरावी लागेल. जीवनात एक होण्यासाठी एकाला माना, एकाला जाना आणि एक व्हा असे आवाहन शिक्षक सुनिल बोरकर यांनी केले. स्थानिक रिसोड मार्गावरील संत निरंकारी भवन येथे रविवार, 17 डिसेंबर रोजी सत्संग प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीराम महाराज, गुलाब महाराज जाधव, बंडेवार, इंगोले आदींची उपस्थिती होती.

       पुढे बोलताना बोरकर म्हणाले की, जीवनात गुरु करावा लागेलच. पाणी पिना छान के, गुरु करना जान के नाही तर या युगात कानफुके, गंडादोरे, पेट्या देणारु गुरु खुप मिळतील. ईश्‍वराची भक्ती करताना निर्मळ अंत:करणाने भक्ती करावी. देवाला काहीही मागु नये. देवाला प्रश्‍न पडावा की मी या भक्ताला काय देवू. जसे बोल्होबा महाराज व कणकाई माता यांच्या पोटी पांडूरंगाने एक सुंदरसे बाळ दिले. म्हणतात ना ‘ पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’त्याचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाले. सुनिल बोरकर यांनी असे अनेक दृष्टांत सांगुन भक्तांना मंत्रमुग्ध केले. एकमेकांच्या पाया का पडावे याचा त्यांनी सुंदर दृष्टांत सांगीतला. ते म्हणाले की, महाभारतात दुर्योधन भिष्मपिता यांना म्हणाले की, तुम्ही पांडवांना का मारत नाही मला सांगा. त्यांना नाश कधी होणार. भिष्मपिता म्हणाले उद्या. हे भगवान श्रीकृष्णाने जाणले आणि दौपदीला तेवढया रात्री भिष्मपिताचे दर्शन घ्यायला लावले. भिष्मपितांनी आशिर्वाद दिला सौभाग्यवती भव. नंतर त्यांच्या लक्षात आले की मी काय आशिर्वाद दिला. दौपदी तुझ्यासोबत कोण आले आहेत. दौपदी म्हणाली, माझ्यासोबत माझा भाऊ श्रीकृष्ण आहे. एका दर्शनाने पांडव वाचले. हे कृत्य कौरवाने केले असते तर आज कौरव वाचले असते. अशा अनेक गोष्टीचा सहारा घेवून निरंकारी मिशन 1929 पासून ते आजपर्यत सद्गुरु माता सविंदर हरदेवसिंहजी महाराजांच्या आशिर्वादाने प्रेम, दया, करुणा, सहिष्णूता, सहनशिलता, विशालता, परोपकार इतर कार्य गावागावापर्य पोहचविण्याचे कार्य करीत आहे. या प्रवचनाला भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सम्राट टाईम्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा