शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

मोरगव्हाण येथील सरपंच अपात्रतेला आयुक्तांची स्थगीती


सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
वाशीम - रिसोड तालुक्यातील मौजे मोरगव्हाणवाडी येथील नवनिर्वाचित सरपंच भागवत गणपत गवळी यांच्या 16 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या अपात्रता आदेशाला विभागीय आयुक्तांनी 22 डिसेंंबर रोजी स्थगीती आदेश देत या प्रकरणाची सुनावणी 17 जानेवारी 2018 रोजी विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात ठेवण्यात आली आहे. तसेच अपीलार्थींना 10 जानेवारीपर्यत कागदपत्रे सादर करण्याबाबत सुचित केले आहे.
    मौजे मोरगव्हाणवाडी येथील सरपंच पदाची निवडणूक होवून 9 सप्टेंबर रोजी झालेल्या निकालामध्ये भागवत गणपत गवळी हे जनतेतून सरपंच पदासाठी निवडून आले होते. 24 डिसेंंबर गवळी हे ग्रामपंचायतीचा प्रभार घेणार होते. मात्र त्याआधीच 6 डिसेंबर रोजी अनंता कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करुन सरपंच गवळी यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. या तक्रारीमध्ये कांबळे यांनी नमुद केले होते की, भागवत गवळी हे भोकरखेडा येथील रहिवासी आहेत. जातीचे प्रमाणपत्र काढतेवेळी त्यांचा रहिवासी दाखला भोकरखेडा येथील आहे. मात्र त्यांना भोकरखेडा येथील रहिवासी रकान्यातुन कमी न करता मोरगव्हाण येथील रहिवासी दाखवले. तसेच त्यांनी भोकरखेडा येथे सरपंचपदाची निवडणूक लढवून ते निवडून आले आहेत. यासंदर्भात कांबळे यांच्या तक्रार अर्जावर जिल्हाधिकारी यांनी 16 डिसेंबर रोजी आदेश काढून सरपंच गवळी यांना अपात्र ठरविले होते. यानंतर भागवत गवळी यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेवून जिल्हाधिकार्‍यांच्या अपात्रता आदेशाविरुध्द अपील अर्ज दाखल केला. विभागीय आयुक्तांनी गवळी यांच्या अपील अर्जावर सुनावणी घेवून जिल्हाधिकार्‍यांच्या अपात्रता आदेशाला स्थगीती देवुन पुढील सुनावणीपर्यत गवळी यांचे सरपंचपद कायम ठेवले. व 17 जानेवारी रोजी अपिलकर्त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. 

सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा