सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

तेरवीचा खर्च टाळून 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला


उलेमाले परिवाराचा स्तुत्य निर्णय

सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - समाजाच्या चालीरितीला फाटा देवून सामाजीक जाणीवेतून आदर्श शिक्षक स्व. प्राचार्य दत्तात्रय उलेमाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तेरवीचा खर्च टाळून 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय माजी नगराध्यक्षा लताताई उलेमाले तथा समाजसेवी पंकज व नितीन उलेमाले आदींनी घेतला आहे. सदर निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. आदर्श शिक्षक स्व. दत्तात्रय उलेमाले यांचे रविवार, 17 डिसेंबर रोजी निधन झाले. 18 डिसेंबर रोजी त्यांच्यावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्यांचा सावडण्याचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. आज समाजात जुन्या चालीरिती, परंपरेच्या नावाखाली लाखो रुपयाचा खर्च करण्यात येतो. एकीकडे अंधाराची वाट तर दुसरीकडे प्रकाशाची पहाट दिसत आहे. उलेमाले परिवार पूर्वीपासूनच सामाजीक दायित्वाचा निर्वाह करत असून स्व. उलेमाले यांनीही त्यांच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य करुन वृक्षसंवर्धनाचा नारा देत त्यांनी 99 हजार वृक्षारोपण केले. सोबतच दोन लक्ष वृक्ष वितरीत केले होते. राष्ट्रीय व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये त्यांनी अनेक वेळा सहभाग नोंदविला. मौजे कामरगाव येथील जि.प. शाळेतून त्यांनी प्राचार्य या पदावरुन सेवानिवृत्ती घेतली होती. आपल्या परिवारालाही त्यांनी समाजसेवेचे आदर्श धडा दिला होता. नितीन व पंकज उलेमाले ही दोन्ही मुले सामाजीक कार्यात सक्रीय असून अनेकांना अडीअडचणीच्या वेळी त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. आपल्या वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ तेरवीचा कार्यक्रम न करता 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देत असल्याची माहिती नितीन उलेमाले यांनी दिली. सदर निधीचा उपयोग मुख्यमंत्री गरजवंत व राज्यातील शेतकरी यांच्या विकासाकरीता लावतील. आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात या आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना 51 हजार रुपयाचा सहायता निधी सुपुर्द करण्यात येणार असल्याचेही पंकज व नितीन उलेमाले यांनी सांगीतले.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा