सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

श्रेयासाठी घाईने हागणदारीमुक्त घोषित माहुर तालुक्यातील अनेक गावात शौचालयाची कामे अपूर्ण

 स्वच्छ भारत मिशनवर प्रश्नचिन्ह ?

 श्रेयासाठी घाईने हागणदारीमुक्त घोषित  माहुर तालुक्यातील अनेक गावात शौचालयाची कामे अपूर्ण

तपासणी समिती स्थापन करून तालुक्यात दौरा करून वास्तव उजेडात आणणार !  सुदर्शन नाईक
—————————————————

श्रीक्षेञ माहुर : - कार्तिक बेहेरे

             माहुर तालुक्यातील अनेक गावात  ग्रामस्थ अजुनही रस्त्याच्या कडेला शौचास बसत असल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या हाती टमरेल कायम असल्याचे चिञ सर्वञ दिसत आहे.नुकतेच माहूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा प्रशासन स्तरावरून करण्यात आली असून अत्र, तत्र सर्वत्र अनेक गावात उघड्यावर शौचास जाणे काही थांबलेले दिसत नसून त्यामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने आम्हीच मोठे विकास पुरुष असल्याचा दावा करणारे विद्यमान लोकप्रतिनिधी आगामी निवडणुकीत श्रेय मिळून लाभ  घेण्यासाठी घाईगडबडीनेच अनेक समस्या कायमच असतांना सत्तेच्या जोरावर जाहीर करून घेत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रकार करत असून. या सर्व बाबीचा विविध सामाजिक संघटना व इच्छुक पत्रकार मंडळीचा समावेश असणारी राजकारण विरहीत समिती स्थापन करून माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करून “दुध का दुध, अन पाणी का पाणी”  करून वास्तव जनतेसमोर आणणार असल्याचा मनोदय शिवसेना तालुका संघटक तथा बंजारा तांडाचे उपसरपंच युवा नेते सुदर्शन नाईक यांनी दै. आदर्श गावकरीशी बोलतांना व्यक्त केला आहे.
     यापूर्वीच्या सरकारने राबविलेले स्वच्छ भारत अभियानामध्ये विद्यमान सरकारने त्यांच्यापण काही संकल्पना घुसवून हे अभियान सलग केले व “ स्वच्छ भारत स्वस्थ भारत” चा नारा देत प्रधानमंत्री ना. नरेंद्र भाई मोदीजीनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिल्ली ते गल्ली पर्यंत प्रशासनाच्या शिलेदारांना सक्त ताकीद देऊन स्वच्छ भारत निर्माण झाला पाहिजे असा आग्रह धरला व  ग्रामिण भागातील ग्रामस्यांचे आरोग्य चांगले रहावे,त्यांना कोणत्याही प्रकारच्या आजारांची लागण होऊ नये,व परिसरात  घाणीचे साम्राज्य पसरु नये यासाठी शासनाने करोडो  रुपये खर्च करुन योजना राबवली त्या पैकी निर्मल भारत अभियान गावागावत राबविल्या जाते. पण गावात स्वच्छ परिसरच दिसत नसल्याने ही योजना कुठे राबविली जाते हे  गुलदस्त्यातच आहे.
     अनेक गावात शौचालय नसल्याने पुरुष व महिला वर्ग रस्त्यावर बसत असल्याने रोगराई पसरत आहे.यावरुन ग्रामिण भागात ही योजना कशी राबविली जाते हे या वरुन दिसुन येते.महिला वर्गाना शौचास जाण्या करीता मोठी कसरत करावी लागते. शासन एकीकडे प्रत्येकांच्या घरी शौचालय व्हावे गाव हागणदारी मुक्त व्हावे यासाठी विषेश प्रयत्न करीत नविन योजना राबविते  ,माञ  प्रशासनातील काही प्रशासप्रिय अधिकारी  व लोकप्रतिनिधीची मर्जी राखण्याच्या व त्यांच्या  श्रेय लाटण्याच्या  लढाईत या योजनेची फलश्रुती ही कुठेच दिसत नाही. तालुक्यात बरेच गाव निर्मल ग्राम म्हणुन निवडले व तेथे ही योजना राबविली माञ त्या गावातील परिस्थिती जैसे थे आहे महिलांना शौचास जाण्यासाठी केव्हा अंधार पडेल  याची प्रतिक्षा करावी लागते ही बाब सर्वासाठी अपमानस्पद आहे. तरीही या कडे अनेक कुटुंब जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे.
     शौचालय बांधण्याकरिता येणाऱ्या  अनुदानातुन अनेक ठिकाणी शौचालय पुर्ण होत नाही तर नागरिकांना कर्ज काढून भरती करावी लागत असल्याची  ग्रामस्थ ओरड करतात.शासनाच्या वतीने मिळणाऱ्या इंदीरा आवास योजनेत घर व शौचालय बांधण्याची अट आहे.परंतु या योजनेचा निधी हा अभियंता वा अधिकारी आपल्याच मर्जीने लाभर्थाना वाटप करतात आणि पुर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्याना उर्वरीत अनुदानासाठी पंचायत समितीला जावुन पायपीट करावी लागते माञ तरीही अधिकारी लक्ष द्यायला तयार नसतात आणि या योजनेत लाभार्थी पाञ ठरला तरी अधिकारी व ग्रा.प.चे सदस्य धनादेश काढण्यासाठी चिरीमीरी मिळते का हेच पाहतात. या मुळे योजना कोणतीही असो हा व्यवस्थित पणे राबवित नसल्याने त्याचा लाभ हा नागरिकांना होतांना दिसत नाही.उसनवार पैसे काडुन शौचालयाचे काम केले तरी वेगवेगळी कारणे समोर करीत अधिकारी हे नागरिकांना नाहक ञास देतात.अनेकाकडे शौचालय बांधुन असतांना त्याचा वापर करीत नसल्याने निर्मल भारत योजनेचा माहुर तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसुन येत असल्याने याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी असून आता तपास समिती स्थापन करून वास्तव स्थिती जाणून घेणार व जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असून तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या गावातील वस्तुस्थिती ची माहिती दिल्यास त्याचा निश्चितच पाठलाग करणार असल्याचेही शेवटी नाईक यांनी सांगितले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा