वाशिम येथे रोजगार मेळावा
सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २४४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
यावेळी मोतोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. नारायण गोटे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अ. सं. ठाकरे, प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकमध्ये श्री. ठाकरे म्हणाले, बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून घेऊन युवकांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लावावा. डॉ. गोटे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यामध्ये औरंगाबाद येथील लॉकसेफ मल्टीसर्व्हीसेस प्रा. लि., धूत ट्रान्समिशन, पुणे येथील एस. आय. एस. इंडिया प्रा. लि., नागपूर येथील नवभारत फर्टिलायझर्स प्रा. लि. आणि वाशिम येथील एस.आय.सी. कार्यालय आदी उद्योजक सहभागी झाले होते. यावेळी ७२२ उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या. यापैकी २४४ उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. भोळसे यांनी तर आभार प्रदर्शन डी. ई. वावगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा