शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत १७३ मुलांची इको कार्डीयोग्राफी


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ह्रदयरोग इको कार्डीयोग्राफी (२ डी इको) शिबिराचे आयोजन आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील १७३ मुला-मुलींची २ डी इको कार्डीयोग्राफी तपासणी करण्यात आली. यापैकी ७२ मुले ह्रदयरोगग्रस्त असल्याचे आढळून आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती सुधीर गोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. जनार्धन जांभरुणकर, डॉ. अनिल कावरखे, डॉ. सुधीर जिरवणकर, नेत्र चिकित्सा अधिकारी जगदीश बाहेकर, नितेश मलिक, धनंजय गोरे, सोनाली ठाकूर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या आरोग्य तपासणी दरम्यान ज्या मुलांमध्ये हृदयरोगाची लक्षणे आढळून आली, अशा १७३ मुलांची तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात इको कार्डीयोग्राफी शिबीर आयोजित करण्यात आले होते. याकरिता औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुखेडकर व डॉ. महेश केदार वाशिम येथे आले होते. यावेळी त्यांनी सर्व मुलांची २ डी कार्डीयोग्राफी केल्यानंतर यापैकी ७२ मुलांना हृदयरोग असल्याचे निदान झाले आहे. या सर्व मुलांवर येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. केदार यांनी यावेळी सांगितले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. डी. आर. ससे, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक रत्ना मोरे, मंगलसिंह राजपूत, कैलास गायकवाड, तुषार ढोबळे, अमोल माने, संदेश डहाळे यांच्यासह सर्व तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पंढरी देवळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सनी शर्मा यांनी केले.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा