वाशिम, दि. ०२ : देशातील ११५ मागास जिल्ह्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या सहयोगाने नीती आयोग ‘कन्वर्जन्स, इन्टग्रेशन अँड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस्’ हा उपक्रम राबविणार आहे. यासाठी मानव विकास निर्देशांकाच्या निकषावर वाशिम जिल्ह्याची निवड राज्य शासनाने केली आहे. केद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी यांची वाशिम जिल्ह्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून केंद्र सरकारने नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती मुखर्जी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्याची सामजिक, आर्थिक परिस्थिती व आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण आदी बाबींवर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील लोकांचे जीवनमान उंचावणे, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, रोजगार, सध्या उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच विकासाच्या दृष्टीने योजनांची आखणी करणे याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांनी यावेळी माहितीचे सादरीकरण केले.
यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, आत्माचे प्रकल्प संचालक डी. एल. जाधव, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, श्री. बोरसे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
‘क्यू-ऑस’ मशीनद्वारे अभिलेख वितरणाचे कौतुक
नागरिकांना ऑनलाईन सातबारा व जुने अभिलेख एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘एनी टाईम डॉक्युमेंटस मशीन’ अर्थात क्यू-ऑस मशीनची अतिरिक्त सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्यांना मशीनच्या कार्यपध्दतीची माहिती दिली. तसेच या मशीनमुळे नागरिकांना अतिशय कमी कालावधीत व कमी खर्चात जुने अभिलेख, ऑनलाईन सातबारा उपलब्ध होत असल्याचे सांगितले. या मशीनमध्ये जिल्ह्यातील ४४ लक्ष ८७ हजार पेक्षा अधिक अभिलेख अपलोड करण्यात आले असून नागरिकांना ते एका क्लिकवर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाचे श्रीमती मुखर्जी यांनी यावेळी कौतुक केले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा