बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

विकास कामात लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्वाची - उपसभापती माणिकराव ठाकरे






नागपूर, दि. 13 : राज्यातील सर्व भागाचा समान विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नेहमी सतर्क राहावे लागते. विकास कामात लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्वाची असते. विधीमंडळात उपलब्ध असलेल्या विविध आयुधांचा योग्य उपयोग करुन विकासात्मक कामे, आपल्या मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. त्या अनुषंगाने असे प्रतिपादन  विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘लोकशाही राज्यातील लोकप्रतिनीधींची विकासात्मक भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.

श्री. उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, राज्यातील भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे निर्माण होणारे प्रश्नही वेगवेगळे असतात. या सर्वांचा विचार करुन प्रश्न सोडविणे आणि विकासात्मक काम  करुन घेणे आवश्यक आहे. राज्याचा कुठलाही भाग विकासात मागे राहून असमानता निर्माण होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घ्यावी. विधीमंडळाने लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी तारांकित प्रश्न,लक्षवेधी, अतारांकित प्रश्न, अर्धातास चर्चा व अशासकीय ठराव असे आयुध उपलब्ध करुन दिले आहेत. यांचा योग्य वापर करुन विकासात्मक कामे करण्यास व प्रश्न सोडवून घेण्यासाठी उपयोग करावा. विकासात्मक काम करुन घेण्यासाठी पहिल्यांदा आपले काम अर्थसंकल्पीय पुस्तिकेमध्ये समाविष्ट करुन घेणे आवश्यक असल्याने लोकप्रतिनिधींनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण स्तरावर निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा, पंचायती समिती व जिल्हा स्तरावर जिल्हा समिती निर्माण केली असून सर्वांगिण विकास होण्यासाठी विकेंद्रीकरण करण्याचा दृष्टीकोन ठेवला आहे. जिल्हा विकास निधीतून जिल्ह्यातील विकास कामांना निधी दिला जातो. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आपआपल्या भागाचा विकास होण्याच्या दृष्टीने मागणी करतात. त्या अनुषंगाने निधी उपलब्ध करुन दिला जातो. लोकप्रतिनिधींनी सदैव जागृत आणि सतर्क राहून आपल्या भागातील विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. बदलत्या परिस्थितीत लोकप्रतिनिधींची भूमिकाही बदलती असली पाहिजे, असे सांगुन ते म्हणाले प्रस्तावित केलेल्या विकास कामांची छाननी करुन ते स्वीकारली पाहिजेत. तसे न झाल्यास लोकलेखा समितीला शिफारस करुन दंड करण्याचा अधिकार आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक लोकशाही पद्धती स्वीकारली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून एक व्यक्ती एक मत याद्वारे सर्वांना समान अधिकार दिला. विविध भाषा, धर्म यांना एकसंघ बांधण्याचे काम केले. विकास होण्यासाठी स्पर्धा असणे महत्वाचे आहे. स्पर्धेशिवाय विकास होऊ शकत नाही. आपण स्वीकारलेल्या लोकशाही पद्धतीमुळेच मंदीच्या काळातही आपणास झळ पोहोचली नाही, असेही उपसभापती श्री. ठाकरे यांनी सांगितले.

प्रारंभी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपसभापती श्री.ठाकरे यांनी समर्पक उत्तरे दिली.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा