बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

त्या मागासवर्गीय संस्थेवरील कारवाई आकसापोटी व हेतुपुरस्पर


जिल्हयातील सर्व औद्योगीक संस्थांच्या चौकशीची मागणी 
विविध आंबडकरी संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - तालुक्यातील जनुना येथील तुळसाई मागासवर्गीय सहकारी संस्थेसंदर्भातील अफरातफरीचा विशेष लेखा परिक्षकांनी प्रसिध्द केलेला अहवाल हा हेतुपुरस्पर असून सदर संस्था ही मागासवर्गीय असल्यामुळे ही कार्यवाही जाणीवपुर्वक व जातीआकस ठेवून केला असल्याचा आरोप विविध आंबेडकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनु. जाती जमाती अन्या प्रतिबंधक कायदा 1981 (4) प्रमाणे योग्य ती कार्यवाही करुन जिल्हयातील लेखा परिक्षण झालेल्या इतर संस्थांचे अहवालही प्रसिध्द करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. आंबेडकरी संघटनांच्या सर्व पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.
  निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हयात अनेक औद्योगिक सहकारी संस्था आहेत. काही कारणामुळे अनेक संस्था ह्या डबघाईस आल्यामुळे चालु नाहीत. तसेच अनेक संस्थांमध्ये घोटाळे असून याबाबतचे अहवाल वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द न होता परस्पर या संस्थांना केवळ निबंधक कार्यालयाकडून त्रुटी सुचना कळविण्यात येतात. परंतु तुळसाई मागासवर्गीय संस्थेला संबंधीत अधिकार्‍यांनी काही माहिती न विचारता केवळ मागासवर्गीय संस्था असल्यामुळे संस्थेचे बदनामीकारक वृत्त प्रकाशित करुन त्या संस्थेला अपमानीत केले आहे. या घटनेचा निषेध करण्यात येत असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व संबंधीत अधिकार्‍यांनी जिल्हयातील इतर औद्योगिक संस्थेच्या बाबतीत लेखा परिक्षणाचे अहवाल येत्या आठ दिवसात पत्रकार परिषद घेवून प्रसिध्द करावे. उपरोक्त संस्था ही मागासवर्गीयांची असल्यामुळे हेतुपुरस्पर व जाणीवपुर्वक आणि जाती आकस ठेवून केलेली कार्यवाही आहे. त्यामुळे अनु. जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा 1981 प्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करुन न्याय देण्याची मागणी दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना सामाजीक कार्यकर्ते अनंत तायडे, भाई गोवर्धन चोथमल, रिपाईचे जिल्हाध्यक्ष देवा इंगळे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, कार्याध्यक्ष अनिल कांबळे, आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ताजणे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पडघान, दलित मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी भगत, विदर्भ उपाध्यक्ष जग्गु राऊत, मनवर इंगोले आदी उपस्थित होते
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा