बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

चौकशीच्या लेखी आश्वासनाने दिनकर मुसळे यांचे उपोषण मागे


आवारभिंंत बांधकामाची सक्षम अभियंत्यांमार्फत पाहणी
वाशीम - तालुक्यातील मौजे ब्रम्हा येथील देवस्थान पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात आलेल्या आवारभिंतीच्या निकृष्ट बांधकामाच्या चौकशीकरीता 26 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले माजी  सरपंच दिनकर मुसळे यांनी मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर त्याच दिवशी सायंकाळी आपले उपोषण मागे घेतले.
    क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत ब्रम्हा येथे अंतर्गत आवारभिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र ठेकेदारांनी या आवारभिंतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून हे काम सरकारी अंदाजपत्रकानुसार झाले नसल्याचा आरोप माजी सरपंच दिनकर मुसळे यांनी करुन यासंदर्भात 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून उपोषणाचा इशारा दिला होता. या कामाची चौकशी करुन या कामाची चौकशी झाल्याशिवाय संंबंधीत ठेकेदाराला शेवटचा हप्ता देण्यात येवू नये. तसेच यासंदर्भात वारंवार जि.प. च्या बांधकाम अभियंत्यांना तक्रारी देवूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. तसेच जिल्हाधिकारी यांनी मुसळे यांच्या 9 नोव्हेंबर रोजीच्या पत्राला उत्तर देवून मुसळे यांच्या तक्रार अर्जावर त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना 13 डिसेंबर रोजी जि.प. कार्यकारी अभियंता बांधकाम यांना पत्र देवून केली होती. मात्र त्यानंतरही कार्यकारी अभियंता यांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे दिनकर मुसळे यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशार्‍यानुसार 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणास प्रारंभ केला. दरम्यान मुसळे यांच्या उपोषणाची जि.प. प्रशासनाने त्वरीत दखल घेवून उपोषणकर्त्याच्या मागणीनुसार आवारभिंतीची पाहणी सक्षम अधिकार्‍यांमार्फत 5 जानेवारी पर्यत करण्यात येईल असे लेखी आश्वासनपत्र बांधकाम उपअभियंता मालाणी यांनी मुसळे यांना दिले. या पत्राने मुसळे यांचे समाधान होवून त्यांनी त्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. जि.प. सदस्य किसनराव मस्के यांनी मुसळे यांना निंबुशरबत पाजून उपोषण सोडविले. यावेळी बांधकाम उपअभियंता मालाणी, उगले, हरिभाऊ मुसळे, निवासराव मुसळे, ग्रामसेवक पडघान, खरोळाचे सरपंच दिपक खडसे, ब्रम्हाचे सरपंच संदीप मुसळे, ब्रम्हा देवस्थानचे सचिव मदन मुसळे, कैलासराव मुसळे, उध्दव इंगळे, गोविंदराव मुसळे, नामदेव मुसळे, लक्ष्मण दत्तराव मुसळे, संतोष इंगळे, रमेश मुसळे, नारायण मुसळे आदींचीं उपस्थिती होती.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा