सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - वाशीम नगर परिषदेची स्वच्छ सर्वेक्षण 2018 करीता निवड झाली असून स्वच्छ व सुंदर वाशीम करण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतला असून हे अभियान एक चळवळ म्हणून राबविण्यात येणार असून यासाठी सर्वाचे सहकार्य जरुरी असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी केले. स्थानिक नवीन आययुडीपी येथील अग्नीशामक दल कार्यालयात 6 डिसेंंबर रोजी नगर परिषदेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या स्वच्छता दुतासोबत आयोजीत बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी बैठकीला मुख्याधिकारी गणेश शेटे, नगरसेवक बापुभैय्या ठाकुर, मिठुलाल शर्मा समवेत नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना स्वच्छता अॅपची माहिती देण्यात आली असून सर्व जनतेने मोबाईलमध्ये स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी केले. नगर परिषदेच्या वतीने स्वच्छतेकरीता 25 नवीन गाड्याचे आगमन 15 ते 16 डिसेंबर रोजी होत असून यावेळी स्वच्छतादुत व मान्यवरांच्या उपस्थितीत याचे लोकार्पण करण्यात येवून शहरातुन स्वच्छतेबाबत जनजागृतीकरीता स्वच्छता दिंडी काढण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. सोबतच स्थानिक सर्व मंगल कार्यालये, शैक्षणिक संस्था यांनाही या अभियानात सक्रीय सहभागी होण्याकरीता काही आकर्षक योजनांचा समावेशही करण्यात आलेला आहे. नागरीकांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्याकरीता प्रत्येक वार्डात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून ज्यांनी खड्डा खोदुन त्यामध्ये कचर्याची विल्हेवाट लावली तर त्याला प्रोत्साहन म्हणून न.प. च्या वतीने टॅक्स करामध्ये विशेष सुट देण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष हेडा यांनी यावेळी दिली. यावेळी स्वच्छता दुतांनी वेगवेगळ्या सुचना मांडून आपले विचार व्यक्त केले. या बैठकीला स्वच्छतादुत निलेश सोमाणी, प्रा. हरिभाऊ क्षिरसागर, डॉ. अनिल कावरखे, दिलीप मेसरे, संदीप पट्टेबहादुर, शंकर नेनवाणी, सौ. निता वर्मा, सईदखान वाहेदखान, पदमिनीबाई जगताप, मनोज काळबांडे, सचिन करवा, डॉ. मंजूश्री जांभरुणकर, सुनिल मिसर, डॉ. सौ. निलिमा घुनागे, कु. आस्था मेहकरकर, सौ. प्रमोदीनी भोंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वच्छतेला शहरात गती देण्याकरीता आगामी काही काळात आणखी स्वच्छतादुत व त्यांना सहकार्य करण्याकरीता स्वच्छतामित्र नियुक्त करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिली.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा