· सन २०१८-१९ करिता १८७४ कोटी रुपयांचा आराखडा
सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम -जिल्हास्तरीय सल्लगार समितीच्या (डीएलसीसी) बुधवारी झालेल्या बैठकीत ‘नाबार्ड’ने सन २०१८-१९ करिता जिल्ह्यातील विविध कर्ज वितरणासाठी तयार केलेल्या १८७४ कोटी ५० लक्ष ८५ हजार रुपयांच्या संभाव्ययुक्त कर्जवाटप योजनाविषयी पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, ‘आरसेटी’चे संचालक प्रदीप पाटील यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
‘नाबार्ड’ने तयार केलेल्या सन २०१८-१९ करिता तयार केलेल्या संभाव्ययुक्त कर्ज योजनेमध्ये पीक कर्जासाठी १४३० कोटी रुपये, लघु उद्योग क्षेत्रासाठी ६१.९३ कोटी रुपये, शैक्षणिक कर्जासाठी ४८ कोटी रुपये, घरबांधणी कर्जासाठी ९६ कोटी रुपये, इतर प्राधान्य क्षेत्र अंतर्गत कर्ज वाटपासाठी ५४ कोटी रुपये व कृषिपूरक पायाभूत सुविधा निर्मितीसाठी १७.३८ कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या बैठकीमध्ये रब्बी पीक कर्जवाटप, बचत गटांना कर्ज वाटप, मुद्रा योजना कर्ज वाटप, विविध महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्जवाटपाचा आढावा घेण्यात आला. विविध योजनांसाठी काही बँकाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. तसेच आगामी तिमाहीमध्ये सर्व बँकांनी कर्ज वितरणाची स्थिती सुधारण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात ‘आरसेटी’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. ‘आरसेटी’चे संचालक प्रदीप पाटील यांनी यावेळी माहितीचे सादरीकरण केले.
सम्राट टाइम्स टाइम्स

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा