सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध गरिबांसाठी शासनामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ३७० लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येत आहे. त्यामुळे या निराधार, गरीब लाभार्थ्यांना जगण्यासाठी आधार मिळत आहे.
राज्य आणि केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत सामाजिक अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या प्रमुख सहा योजनांचा समावेश आहे. या अंतर्गत बहुतांश निराधार, विधवा, अपंग, वृद्ध अशा समाजघटकांना समाविष्ट करुन लाभ दिला जातो.
वाशिम जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १८ हजार ५९१ लाभार्थ्यांना तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने अंतर्गत ४४ हजार ४२२ लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन अदा करण्यात येते. तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत २३ हजार ९०२ लाभार्थींनी अनुदान देण्यात येते आहे. आर्थिक अनुदानाची रक्कम दरमहा या लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केले जात आहे. एखाद्या गरीब कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत सदर कुटुंबाला एक रक्कमी २० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा