गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला विविध योजनांचा आढावा


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आज अमरावतीचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्तांनी विविध योजनांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी डी. एस. वानखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. बेथरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१५-१६, सन २०१६-१७ मध्ये झालेली कामे तसेच सन २०१७-१८ मध्ये निवडलेल्या गावांमधील कृती आराखड्यांच्या सद्यस्थितीचा विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. तसेच सन २०१७-१८ मधील कामांसाठी आराखडा मंजुरी घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत ७६३ शेततळी पूर्ण झाली आहेत. तूर तसेच रब्बी हंगामातील पिके निघाल्यानंतर शेततळे पूर्ण करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात झालेल्या शौचालय उभारणीच्या कामाचाही श्री. सिंह यांनी यावेळी आढावा घेतला. ग्रामीण भागात कारंजा तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. उर्वरित पाच तालुके हागणदारीमुक्त करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेमधील घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत अभियान, कृषीपंप वीज जोडणी, रस्त्यांची दुरुस्ती, अपूर्ण सिंचन प्रकल्प, सिंचन विहिरी आदींचाही विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी आढावा घेतला.
सम्राट टाइम्स लाईव्ह

-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा