· ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ परिसंवादातील सूर
· राष्ट्रीय पत्रकारिता दिवसानिमित्त आयोजन
सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : झपाट्याने बदलत असलेले तंत्रज्ञान, सोशल मिडियाचा वापर आणि इतर सामाजिक, आर्थिक बदलांमुळे आज सर्वच प्रसारमाध्यमांसमोर नव-नवीन आव्हाने तयार झाली आहेत. या आव्हानांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी पत्रकारांनी काळानुरूप बदल स्वीकारणे आवश्यक आहे, असा सूर राष्ट्रीय पत्रकार दिवसानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आयोजित परिसंवादात उमटला.
भारतीय प्रेस परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त यावर्षी राष्ट्रीय पत्रकारिता दिवसामध्ये ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे उपस्थित होते. श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, सुनील मिसर, निलेश सोमाणी, सुनील कांबळे आदींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांनी केले. प्रारंभी लेखणी, लोकराज्य व वाशिम जिल्हा माहिती पुस्तिका भेट देऊन सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. क्षीरसागर म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बदल घडून आले आहेत. प्रत्येक वेळी नव्याने समोर येणारे बदल हे माध्यमांवर चांगल्या व वाईट स्वरूपाचे परिणाम करतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांपासून ते आजच्या सोशल मिडीयाच्या स्वरुपात नव्याने उदयास आलेल्या प्रसारमाध्यमाच्या नव्या रुपामुळे हा अनुभव आपण घेतला आहे. अशा परिस्थितीमध्ये माध्यमांनी व माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तींनी काळानुरूप आपल्यामध्ये बदल करून घेतल्यास पत्येक आव्हानांवर मात करता येणे शक्य असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. पूर्वी पारंपारिक स्वरुपात पत्रकारिता करणाऱ्या मुद्रित माध्यमांनी नवीन बदलांचा स्वीकार करून त्याचा वापर आपल्या प्रगतीसाठी केल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत. पत्रकारांना ही अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र त्यावर मात करत समाजाच्या हितासाठी पत्रकारांनी प्रामाणिक पत्रकारिता केली पाहिजे, असे प्रा. क्षीरसागर म्हणाले.
श्री. पगार म्हणाले की, पत्रकारिता करताना प्रत्येकाने संतुलित स्वरुपाची पत्रकारिता करणे आवश्यक आहे. तसेच समाजासाठी सत्याच्या बाजूने लढणे, हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. या दरम्यान विविध स्वरुपाच्या आव्हानांना तोंड देणे सुद्धा क्रमप्राप्त असते. अशा वेळी पत्रकारांनी अतिशय सजगपणे या आव्हानांचा सामना केल्यास त्यावर हमखास मात करता येते. श्री. पगार यांनी विविध शहरांमध्ये पत्रकारिता करताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. सुनील मिसर यांनीही यावेळी उपस्थितांसमोर आपले अनुभव कथन केले.
श्री. बोराडे म्हणाले, पत्रकारांच्या लेखणीतून समाजाला दिशा व ताकद मिळते. त्यामुळे या समाजाच्या विकासासाठी पत्रकारांवर मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी पेलण्याचे आव्हान सुध्दा प्रसारमाध्यमे व पत्रकारांसमोर असते. समाजाच्या विकासात महत्वाचे योगदान देण्याचे काम पत्रकारांना लेखणीच्या माध्यमातून करावे लागते.
माध्यमांसमोर रोज नवीन आव्हाने उभा राहत आहेत. यापूर्वी सुध्दा त्या-त्या कालखंडात माध्यमांसमोर अशी आव्हाने आल्यानंतर माध्यमांनी व पत्रकारांनी त्यावर यशस्वीपणे मात केल्याचे आपण पहिले आहे. त्यामुळे या क्षेत्रात कोणतेही आव्हान आले तरी त्यामुळे खचून न जाता त्यांचा सामना करण्यासाठी पत्रकारांनी सदैव सज्ज राहिले पाहिजे, असे मत सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.
श्री. सोमाणी यांनी प्रसारमाध्यमे, पत्रकार व समाज यांच्या एकमेकांविषयी असणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत मत व्यक्त केले. अनेकदा पत्रकार समाजाच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. अशा वेळी त्याच्यावर कोणते संकट आल्यास समाजानेही त्याच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विश्वनाथ राऊत, राम चौधरी, नागेश घोपे, नंदकिशोर नारे, प्रदीप टाकळकर, आतिष देशमुख, दीपक खडसे, विठ्ठल देशमुख, सत्यनारायण जोशी, सुनील पाटील, गजानन भोयर, दत्ता महल्ले, रमेश उंडाळ, गणेश भालेराव, संदीप पिंपळकर, सौरभ गायकवाड आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप काळे, विजय राठोड, प्रमोद राठोड, विश्वनाथ मेरकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. गजानन वाघ यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती कार्यालयाचे राजू जाधव यांनी केले.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा