शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

राजपुत समाजासह सर्व सामाजीक संघटना रस्त्यावर पद्मावती चित्रपटाचा तीव्र विरोध : जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम - आगामी 1 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणारा संजय लिला भन्साळी यांचा वादातीत चित्रपट ‘राणी पद्मावती’ मध्ये राणी पद्मावतीच्या चरित्राचे विकृतपणे चित्रीकरण केल्याचा आरोप राजपुत समाजाने केला असून हा चित्रपट प्रदर्शित न होण्याच्या मागणीसाठी आज, 17 नोव्हेंबर रोजी शहरातील सर्व राजपुत समाजासह विविध सामाजीक संघटनांच्या वतीने विशाल मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
    रॅलीची सुरुवात मन्नासिंह चौक येथून करण्यात आली. नंतर रॅली शांततामय मार्गाने शहरातील मुख्य रस्त्याने शिवाजी चौक, पाटणी चौक व आंबेडकर चौक या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. याठिकाणी राजपुत समाज संघटनेसह विविध सामाजीक संघटनांच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.
    निवेदनात नमूद केले आहे की, संजय लिला भन्साळी निर्मित राणी पद्मावती हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार असून प्रदर्शन पुर्व जाहीरातीवरुन या चित्रपटात राणी पद्मावती व इतिहासाचा अवमान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी सर्व हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. राणी पद्मावतीचा शौर्य, त्याग आणि बलीदानाचा इतिहास असताना तो विकृतपणे समोर आल्यास केवळ राणी पद्मावतीचाच नाही तर समस्त स्त्री जातीचा व इतिहासाचा अवमान तर होईलच परंतु समाज आणि नव्या पिढीसमोर चुकीचा व विकृतपणे सादर केला इतिहास जाईल. राजपूत समाजाच्या व इतर समस्त हिंदु समाजाच्या भावना या चित्रपटाशी निगडीत असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आमचा तीव्र विरोध आहे. तरी राणी पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहास अभ्यासक व समाजातील काही जाणकार प्रतिनिधी यांना चित्रपट दाखवून त्यातील आक्षेपार्ह भाग वगळावे. तसेच कोणत्याही महापुरुषाची चित्रपटाच्या माध्यमातुन अवमान किंवा इतिहासाची छेडछाड भविष्यात करण्यात येवू नये. तसेच वाशीम जिल्हयाील कोणत्याही सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येवू नये. अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली.
    राणी पद्मावती या चित्रपटाच्या विरोध करण्यास राजपुत समाजाच्या पाठींव्यासाठी विविध सामाजीक संघटना प्रथमच रस्त्यावर उतरल्या असून महापुरुषांचे सामाजीक कार्य हे कोण्या एका जातीसाठी नसून त्यांनी सर्वच जातीधर्माच्या लोकांसाठी इतिहासात अमुल्य असे कार्य केल्यामुळे यापुढे कोणत्याही महापुरुषांचा किंवा त्यांच्या इतिहासाचा अवमान झाल्यास सर्व सामाजीक संघटना याचा तीव्र विरोध करतील अशी प्रतिक्रिया यावेळी सामाजीक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिली. या विशाल रॅलीमध्ये राजपुत संघटन, अखिल भारतीय क्षत्रीय महासभा, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय माळी महासंघ, मारवाडी युवा मंच, सिंधी समाज, विर लहुजी शक्ती सेना, समस्त उत्तर भारतीय समाज, संत सेना न्हावी समाज, परिट समाज, भोई समाज, अखिल भारतीय छावा संघटना व परशुराम युवा बहूभाषिक सामाजीक संघटनेचे पदाधिकारी या विशाल मोटरसायकल रॅलीत तसेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांसह शहरातील चित्रपटगृहाच्या चालकांना सुध्दा राणी पद्मावती चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा