शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम, दि. १० : जिल्ह्यात आंबिया बहरतील संत्रा, आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यासाठी सन २०१७-१८ या वर्षासाठी मान्यता मिळाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

आंबिया बहारातील संत्रा फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डीआसरा, राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहांगीर, रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस, मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलूबाजार, पोटी, कवठळ, धानोरा, पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी बु. कुपटा तसेच कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, कामरगाव, धनज बु. पोहा, खेर्डा, हिवरा लाहे, येवता या महसूल मंडळांचा समावेश विमा योजनेत करण्यात आला आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ७० हजार रुपये असून एकूण विमा हप्ता २६ हजार रुपये आहे. यापैकी शेतकऱ्यांना ३ हजार ५०० रुपये विमा हप्ता भरावा लागणार असून उर्वरित रककम शासन भरणार आहे. संत्रा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत आहे.

आंबिया बहार लिंबूसाठी वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोरे या महसूल मंडळाचा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ६० हजार रुपये आहे. याकरिता एकूण विमा हप्ता ३३, १९२ रुपये आहे, यापैकी शेतकऱ्यांना केवळ ३ हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे असून उर्वरित विमा हप्ता शासन भरणार आहे. लिंबू पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत आहे.

आंबा या पिकाकरीता वाशिम तालुक्यातील केकतउमरा, राजगाव, मानोरा तालुक्यातील मानोरा या महसूल मंडळांचा समवेश विमा योजनेत करण्यात आला आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर १ लक्ष १० हजार रुपये विमा संरक्षण मिळणार असून याकरिता एकूण विमा हप्ता ७७००० रुपये आहे. यापैकी ५ हजार ५०० रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरावयाचा असून उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. आंबा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने यांनी केले आहे.

सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा