सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम - विद्युत मोटरव्दारे धरणातुन पाणी आणून शेतीचे सिंचन करण्यासाठी राजाकिन्ही येथील सोळा शेतकर्यांनी सहा महिन्यापासून कोटेशन व पैसे भरुनही अद्याप शेतकर्यांच्या शेतामध्ये रोहित्र बसविले गेले नाही. त्यामुळे मधुकर सरोदे व इतर शेतकर्यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना 10 नोव्हेंबर रोजी निवेदन देवून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आम्ही सर्व शेतकरी मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील रहिवासी आहोत. आमच्या शेतामध्ये शेती ओलीताकरीता मैराळडोह प्रकल्पामधुन पाणी घेण्याकरीता पाईपलाईन केलेली आहे. याकरीता विज कनेक्शन मिळण्याकरीता आम्ही एकूण 16 शेतकर्यांनी शेतामध्ये दोन डी.पी. बसविण्याकरीता महावितरणचे मालेगाव येथील उप कार्यकारी अभियंता यांच्याकडे रितसर अर्ज करुन डी.पी. बसविण्याकरीता माहे मे 2017 मध्ये कोटेशन व पैसे भरले आहेत. त्यानंतर अजूनपर्यत आमच्या शेतामध्ये डी.पी. बसविण्यात आली नाही. यासंदर्भात आम्ही उपकार्यकारी अभियंता मालेगाव यांच्याकडे अनेक वेळा गेलो. परंतु त्यांनी प्रत्येक वेळा आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तसेच डी.पी. बसविण्याचे कंत्राट अंबाजोबाई येथील कंत्राटदाराला दिल्याची त्यांच्या सही शिक्क्यानिशी कच्चे पत्र आम्हाला दिले आहे. मात्र या पत्राची महावितरण मालेगाव येथील आवक जावक विभागात कोणतीही नोंद नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही रितसर डी.पी. मिळण्यासाठी कोटेशन व पैसे भरुन सुध्दा आम्हाला सद्या सहा महिने होवून सुध्दा अद्याप डी.पी. मिळाली नाही. तसेच संबंधीत अधिकार्यांमुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे.
एकीकडे शासन शेतकर्यांच्या आत्महत्या वाचाव्या, शेतकर्यांच्या शेती विकसित झाली पाहीजे यासाठी शेतकर्यांना सहस्त्र सिंचन विहीर, विद्युत कनेक्शन आदी अनेक योजना शेतकर्यांकरीता राबवित आहेत. तर दुसरीकडे महावितरणचे काही अधिकारीच शेतकर्यांनी पैसे भरुन सुध्दा त्यांना कोणतेही सहकार्य करण्यास तयार नाहीत. अशा अधिकार्यांमुळेच शेतकरी खर्या अर्थाने आत्महत्या करीत आहेत.
आम्ही किन्हीराजा येथील एकूण 16 शेतकर्यांनी नियमानुसार सर्व प्रक्रीया पुर्ण करुन सुध्दा मालेगाव येथील उपकार्यकारी अधिकार्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे आमच्या शेतात अद्याप डी.पी. बसविण्यात आली नाही. परिणामी आम्ही आमची शेतजमीन ओलीताखाली आणू शकलो नाही. त्यामुळे संंबंधीत अधिकार्यांच्या हेतूपुरस्पर दुर्लक्षामुळे आमच्या शेतीचे नुकसान होवून आम्हाला मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रास झाला आहे.
या प्रकरणाची आपण जातीचे संपूर्ण चौकशी करुन येत्या आठ दिवसाच्या आत आमच्या शेतात डी.पी. बसविण्यात यावी. तसेच या प्रकरणी हलगर्जीपणा करणार्या संबंधीत उप कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करावी. अन्यथा नवव्या दिवसापासून महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर सर्व शेतकर्यांसह आमरण उपोषण करण्यात येईल. त्यानंतर आमच्या जिवित्वाची सर्व जबाबदारी महावितरण कार्यालयावर राहील. असा शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाची प्रत उर्जामंत्र्यांना पाठविली आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा