सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली. या योजनेतून आतापर्यंत वाशिम जिल्ह्यातील १६ हजार ८११ महिलांना लाभ मिळाला असून चुलीच्या धुरापासून व त्यासाठी लाकडी जळण मिळविण्याच्या कामापासून सुटका मिळाल्याने या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून देशातील सुमारे ५ कोटी महिलांना घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देण्याचा केंद्र शासनाने संकल्प केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला केवळ एक अर्ज एलपीजी वितरण केंद्रावर जाऊन सादर करावयाचा आहे. एलपीजी केंद्रावर अर्ज नि:शुल्क मिळतो. हा अर्ज ऑनलाईन स्वरुपात सुध्दा भरता येतो. अर्ज सादर करताना अर्जदाराला आपले संपूर्ण नाव,पत्ता, आधार कार्ड नंबर, जन-धन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक आहे. सोबतच पंचायत अधिकारी, नगरपालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र,बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.
योजनेंतर्गत भरलेले अर्ज २०११ च्या सामाजिक व आर्थिक जणगणनेच्या यादीवरून पडताळणी केली जाते. त्या आधारावर लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येतात. अर्ज सादर करताना अर्जदार वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला असावा. तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्याला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन खरेदी करण्याकरिता १६०० रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील इंडैन गॅस वितरकांकडे आतापर्यंत एकूण १४ हजार ८०१ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १३ हजार ४५५ अर्जांची तपासणी पूर्ण होऊन ११ हजार ४८८ लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील भारत गॅस वितरकांकडे एकूण १० हजार ७६ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ९००० अर्जांची तपासणी पूर्ण झाली असून ५ हजार ३२३ महिलांना प्रत्यक्ष गॅस जोडणी मिळाली आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे लाकडी जळण जमा करण्याची चिंता मिटल्याने या महिलांना दिलासा मिळाला आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा