सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त वाशिम तालुका विधी सेवा समितीच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री व तालुका विधी सेवा समितीच्या सचिव तथा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सो. न. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ ते १८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणविषयी जनजागृती केली जात आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून शहरी तसेच ग्रामीण भागातील घरोघरी जाऊन कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
वाशिम तालुका विधी सेवा समितीच्या विशेष मोहिमेंतर्गत दि. १० नोव्हेंबर रोजी वाशिम तालुक्यातील तामसी व सोनखास येथे जिल्हा विधिज्ञ संघ व विधी स्वयंसेवक यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना विधी सेवा प्राधिकरण विषयी माहिती दिली. त्यानंतर दि. १२ नोव्हेंबर रोजी गिव्हा व वाशिम शहरातील पाटणी चौक येथे आठवडी बाजारात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. १३ नोव्हेंबर रोजी दिवाणी न्यायाधीश एस. पी. बुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधिज्ञ संघ व विधी स्वयंसेवक यांनी वाशिम शहरातील भीमनगर, पंचशीलनगरमध्ये नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच त्यांना विधी सेवा प्राधिकरण व त्याच्या कार्यप्रणालीविषयी माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप केले. या मोहिमेंतर्गत जिल्हा सत्र न्यायालय परिसरात विधी सेवा सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले असून याठिकाणी नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला दिला जात आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा