मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

वरदरी बु. ग्रा.पं. चे सदस्य अपात्र जिल्हाधिकारी यांच्या कोर्टाचा निर्णय



सम्राट टाइम्स न्यूज

वाशीम : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या न्यायालयात सुरु असलेल्या एका प्रकरणात सुनावणी दरम्यान 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी अर्जदाराच्या बाजूने निकाल देत मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. येथील गैरअर्जदार ग्रा.पं. उपसरपंच गंगाधर काळूसिंग राठोड व सदस्य सुनिल रामा चौगुले यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. यासंदर्भात अर्जदार वरदरी बु. येथील ग्रा.पं. सदस्य साहेबराव मन्नु आडे यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1985 चे कलम 14 (1-ग) व कलम 16 अन्वये जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात प्रकरण दाखल केले होते.
    वरदरी बु. येथे झालेल्या स्वच्छतेच्या कामात ग्रा.पं. सदस्य गंगाधर राठोड यांनी स्वत:चे हितसंबंध जोपासून स्वत:च्याच नावाने एक हजार रुपयाचे बिल काढले. तसेच ग्रा.पं. मध्ये झालेल्या रंगरंगोटीचे काम ग्रा.प.ं सदस्य सुनिल रामा चौगुले यांनी घेवून या कामापोटी ग्रामपंचायत कडून तीन हजार रुपयाचे बिल स्वत:च्या नावे घेतले. त्यामुळे गैरअर्जदार गंगाधर राठोड व सुनिल चौगुले यांनी ग्रामपंचायतीच्या कामामध्ये प्रत्यक्ष हितसंबंध प्रस्थापित केल्याचा आरोप अर्जदार साहेबराव आडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात सादर केलेल्या प्रकरणामध्ये केला होता. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान गैरअर्जदार दोघांनीही रक्कम घेतल्याचे सिध्द झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट करताना गैरअर्जदार ग्रा.पं. सदस्य गंगाधर राठोड व सुनिल चौगुले यांचे ग्रा.पं. सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निकाल दिला. सोबतच या निकालाविरुध्द आयुक्त कार्यालय अमरावती येथे अपिलीय अधिकार्‍यांकडे गैरअर्जदारांना विहीत मुदतीत अपील करता येईल असेही दिलेल्या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. सदर आदेशाची प्रत 29 सप्टेंबर रोजी अर्जदाराला मिळाली.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा