उमेदवारांचे राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन
राज्य निवडणूक आयुक्तांनी तक्रारीची घेतली तात्काळ दखल
सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम : तालुक्यातील गट ग्रामपंचायत हिस्से बोराळा व तामसाळा येथील ग्रा.पं. निवडणूक निष्पक्ष, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी मतदानदिनी व पुर्वसंध्येला दोन गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवून निवडणूकीत उभे असलेल्या उमेदवारांना संरक्षण देण्याची मागणी उमेदवारांनी केली असून 3 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर विद्यमान सरपंच हुसेन रमजान जानीवाले, अनिल तुकाराम घोंगडे, हकीम हुसेन जानीवाले, गजानन ज्ञानबा उंडाळ, सुमित्राबाई भास्कर इंगोले, दिपमाला विनोद सरदार, बेबीबाई रमेश गोटे, गंगाराम मारोती थोरात संदीप वामन इंगोले व रमेश निरंजन पट्टेबहादूर यांच्या सह्या असून जिल्हाधिकार्यांना निवेदन देते वेळेस उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, ग्रा.पं. हिस्से बोराळा व तामसाळा येथे जनसेवा पॅनलच्या वतीने निवडणूकीसाठी उभे असलेल्या चार उमेदवारांना दहशत व धमकी तंत्राचा वापर करुन नामांकन परत घेण्यात भाग पाडण्यात आले. या दबावामागे कोण आहेत, हे गावाला माहित आहे. मात्र, भयापोटी त्यांचे नाव कोणी घेत नाही. लोकशाहीचा मुलाधार असलेल्या ग्रा.पं. निवडणूका व त्या अनुषंगाने होणार्या ग्रामसभा संसदेपेक्षाही महत्वपुर्ण असल्याची वस्तुनिष्ठता संविधानात नमूद आहे. त्यामुळे लोकतंत्र प्रस्थापित करणारे स्वतंत्र व स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाकडे पाहील्या जाते. जिल्हयात निवडणूक प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी आहे. मात्र जनसेवा पॅनलच्या चार उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याने सदर निवडणूक भयमुक्त वातावरणात होईल याची आम्हाला शाश्वती राहीलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रा.पं. यांचा एकमेकांशी थेट संंंबंध येत असल्याने निवडणूकीच्या काळात गावात हिंसात्मक वाद निर्माण होवू शकते. बोराळा व तामसाळा निवडणूक क्षेत्र संवेदनशिल आहे. तसेच गावखेड्याशी संबंधीत नसणारे बाहेरचे समाजकंटक मतदानाच्या दिवशी गावात येवून दहशत पसरवु शकतात. त्यामुळे गावात साध्या वेशातील पोलीस आणि गणवेशातील पोलीस यांचा बंदोबस्त ठेवल्यास गावातील अनर्थ टळू शकतो. तसेच समाजकंटकांनी काही गैरकृत्य केल्यास त्यांना सहज शोधून कडक शासन करता येते असे निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान अर्जदारांनी निवेदनाची प्रत ई मेलव्दारे राज्य निवडणूक आयुक्तांना पाठविल्यानंतर अवघ्या 25 मिनीटात राज्य निवडणुक आयुक्तांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली व संबंधीत ग्रा.पं.च्या ठिकाणी मतदार व मतमोजणीच्या दिवशी उचित पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देवून त्यासंबंधीचा अहवाल न चुकता पाठविण्याचे आदेशीत केले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधिक्षक, ग्रा.पं. निवडणूक प्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी, ग्रामीण ठाणेदार व तहसिलदार तसेच भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकार्यांना अग्रेषीत केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा