शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

जिल्ह्यात ११ ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू



सम्राट टाइम्स ब्युरो

 जिल्ह्यात दि. २१ सप्टेंबर २०१७ ते दि. २ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत नवदुर्गा उत्सव आणि दि. २२ सप्टेंबर ते दि. ऑक्टोंबर २०१७ या कालावधीत मोहरम उत्सव साजरा होत आहे. दि. ३० सप्टेंबर २०१७ रोजी दसरा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दि. १ व २ ऑक्टोंबर २०१७ रोजी म्होहाराम उत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत सार्वजनिक मिरवणूक काढून नवदुर्गांचे विसर्जन करण्यात येणार आहे. दि. ७ ऑक्टोंबर २०१७ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मतदान होणार असून दि. ९ ऑक्टोंबर २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे. या कालवधीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता दि. २७ सप्टेंबर ते दि. ११ ऑक्टोंबर २०१७ या कालावधीत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या कालावधीत शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी,सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत

सम्राट टाइम्स ब्युरो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा