वाशिम, दि. २९ : जिल्ह्यामध्ये कापूस, तूर पिकांवर कमी अधिक प्र्मामानात कीड, रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापूस पिकावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव काही भागात वाढण्याची शक्यता आहे. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापूस पिकावरील अळीग्रस्त डोमकळ्या नष्ट कराव्यात. प्रति हेक्टरी किमान १० पक्षी थांबे लावावेत. तसेच कीटकनाशकांची फवारणी करताना अति विषारी औषधांचा वापर करू नये. कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊन कीटकनाशकाच्या फवारण्य कराव्यात, असे ‘आत्मा’ कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
कीटकनाशके हाताळताना रबरी मोजे घालावेत, कीटकनाशक द्रावण तयार करताना काठीचा वापर करावा. फवारणीचे द्रावण तयार करण्यापासून पूर्ण होईपर्यत डोक्यावर चष्मा, हातावर मोजे वापरावेत, फवारणीच्या वेळेस धूम्रपान करू नये. फवारणीसाठी उत्तम प्रतीचे स्प्रे पंप व नोझल वापरावे, नोझल साफ करताना तोंडाने फुंकर मारू नये. फवारणी झाल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे. डोके दुखणे, घाम येणे, मळमळ होणे इ. लक्षणे दिसल्यास फवारणी थांबवून प्राथमिक उपचार करावेत. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Samrat time's
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा