बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

ईव्हीएम हटाव मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाचे निवेदन



विनोद तायडे वाशिम

जिल्हयात होणार्‍या 273 ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये ईव्हीएमचा वापर करु नये. तसेच ह्या निवडणूकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर व्हावा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने करण्यात आली असून यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रेमानंद अरखराव, जिल्हा प्रभारी मंगल इंगोले यांच्या उपस्थितीत 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन पाठविण्यात आले.
    निवेदनात नमूद केले आहे की, 7 सप्टेंबर रोजी जिल्हयातील 273 ग्रामपंचायत निवडणूका ईव्हीएम यंत्राव्दारे मुळीच घेण्यात येवू नये. या निवडणूका बॅलेट पेपरने घेण्यात आल्या तरच त्या खर्‍या अर्थाने पारदर्शी, मुक्त आणि निष्पक्ष होतील अशी आमची ठाम धारणा आहे. ईव्हीएम व्दारे निवडणूका घेण्याच्या विरोधात राज्यातीलच नव्हे तर देशातील वातवरण ढवळून निघालेले आहे. ईव्हीएम यंत्रासंंबंधाने हॅकींग, वोट ट्रान्सफर करण्याचे, एकाच उमेदवाराला ईव्हीएम मशीन मधील मत जाण्याचे असे आरोप ईव्हीएम यंत्रावर झालेले आहेत. जि.प., पं.स.स, महानगरपालका, विधानसभा, लोकसभा निवडणूकातील उमेदवारांनी यासंदर्भात न्यायालयामध्ये ईव्हीएम व्दारेच त्यांना पराभूत केल्याच्या याचिका वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केल्या आहेत. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांची सुध्दा याबाबतची याचिका सुध्दा सुप्रिम कोर्टात सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये निवडणूक निष्पक्षपातीपणे होईलच, याची शाश्वती राहीलेली नाही. ईव्हीएम मध्ये घोटाळा होण्याचे सकृतदर्शनी सिध्द झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची फॉरेन्सीक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन ईव्हीएमव्दारे निवडणूका पारदर्शी, मुक्त व निष्पक्ष होत नसल्याचे सिध्द झाले आहे. 10 जूलै 2017 रोजी दिल्ली निवडणूका आयुक्तांनी सुध्दा ईव्हीएम हॅक होत आहे असे मान्य केले आहे. याचा संदर्भ केअर ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावरील बातम्यांमध्ये सहज सापडू शकतो. ग्रामपंचायत निवडणूका ह्या संवेदनशिल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. येथे उमेदवार व मतदार यांचा थेट संबंध येत असल्यामुळे निकालापश्चात येथील वातावरण अशांततामय होत सामाजक व व्यक्तिगत मतभेद निर्माण होवून त्याचे रुपांतर हिंसात्मक वादात होवू शकतो. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने सदर निवडणूक निष्पक्षपाती व वादरहित करण्यासाठी ईव्हीएमचा वापर न करता बॅलेट पेपरनेच निवडणूका घेण्यात याव्यात. निवडणूक आयोग ही लोकशाही प्रस्थापित करणारी स्वतंत्र्य व स्वायत्त संस्था आहे. भयमुक्त व निष्पक्षपाती निवडणूक घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्यामुळे सदर निवेदनाचा रितसर विचार करुन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
    जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रेमानंद अरखराव, जिल्हा प्रभारी मंगल इंगोले, धम्मदास वाकोडे, नारायण पडघाण, डॉ. रवी जाधव, दत्तराव भालेराव, मिलींद सुर्वे, गणेश घुगे, रवि तायडे, आनंद इंगोले, वाजीदखान पठाण, गजानन गवई, सौरभ गायकवाड, विशाल राऊत आदींची उपस्थिती होती.

विनोद तायडे वाशीम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा