बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

17 वर्षाखालील वयोगटातील अमरावती विभागीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेत आदित्य पाटील, ऋति लढ्ढा प्रथम

 17 वर्षाखालील वयोगटातील अमरावती विभागीय



विनोद तायडे वाशिम

  क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वाशिम जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अमरावती विभागीय शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये अमरावती येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आदित्य राजन पाटील व मुलींमध्ये दिग्रस येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी ऋति दिनेश लढ्ढा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेमध्ये प्रथम पाच क्रमांक पटकाविणाऱ्या मुला-मुलींना मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करून गौरविण्यात आले.

याप्रसंगी लॉन टेनिसचे प्रशिक्षक रवींद्र नगरकर, जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे सचिव राजदीप मनवर, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे आदी उपस्थित होते. दि. २५ ते २७ सप्टेंबर २०१७ या कालावधीत अमरावती विभागीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेचे वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथील लॉन टेनिस मैदानावर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांचा शालेय लॉन टेनिस स्पर्धांचा समवेश होता.

१७ वर्ष खालील वयोगटातील मुलांमध्ये अमरावती येथील ज्ञानमाता हायस्कूलचा विद्यार्थी प्रियांशु मालवीय याने द्वितीय, अमरावती येथीलच गोल्डन किड्स इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी इशांत आनंद बिजवे याने तृतीय, अकोला येथील माउंट कार्मेल हायस्कूलचा विद्यार्थी कृष्णा प्रमोद चांडक याने चतुर्थ व दिग्रस येथील दिनबाई विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ सतीश डहाके याने पाचवा क्रमांक पटकाविला. तसेच मुलींमध्ये दिग्रस येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी सलोनी विकास देशमुख हिने द्वितीय, अमरावती येथील के. के. सी. आय. स्कूलची विद्यार्थिनी नेत्रा राजदीप निनगोटे हिने तृतीय, दिग्रस येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी सावी सुधाकर गावंडे हिने चतुर्थ व अमरावती येथील एडीफाय स्कूलची विद्यार्थिनी आरजू सचिन पाटील हिने पाचवा क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकरी श्री. द्विवेदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

अमरावती विभागीय शालेय लॉन स्पर्धेत चांगली कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंनी राज्य स्तरावरही चांगली कामगिरी करून आपल्या जिल्ह्याचे, विभागाचे नाव उज्ज्वल करावे, असे मत जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच सर्व खेळाडूंना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा