शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

आपल्यात दडलेल्या जिजाऊंना ओळखा - सौ. हर्षदा देशमुख



तिसरे फिरते विदर्भ विचार अभियान थाटात
आदिवासी पारधी विकास परिषदेचे आयोजन
वाशीम - स्त्रियांनी परंपरागत चौकटीच्या बाहेर पाय टाकून स्वत:मध्ये धैर्य निर्माण करावे. प्रत्येक महिलांमध्ये सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ दडल्या आहेत. आपल्यात दडलेल्या जिजाऊला ओळखा असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. हर्षदा दिलीप देशमुख यांनी उद्घाटनपर भाषणातून केले.
    स्थानिक जि.प. जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात 31 डिसेंबरला वाशीम जिल्हा आविासी पारधी विकास परिषदेच्या आयोजनातून तिसरे फिरते विचार अभियान कार्यक्रम थाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी पारधी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णराव चव्हाण हे होते. तर उद्घाटक म्हणून जि.प. अध्यक्षा सौ. हर्षदा दिलीप देशमुख ह्या होत्या. शिकारीतून शिक्षणाकडे, व्यसनातुन विचाराकडे या विचारधारेला अनुसरुन मराठवाडा, खान्देश, विदर्भ राज्यातील प्रादेशिक परिसरात विदर्भ विचार जागर अभियान घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत वाशीम येथे हे अभियान पार पडले. प्रमुख वक्ते ‘दैना’ कादंबरीकार नामदेव भोसले आपले विचार मांडतांना म्हणाले की, महिला आजही चुल व मुल या सांसारीक वलयातून बाहेर आल्या नाहीत. त्यांनी आता स्वत:ला सिध्द करण्याची वेळ आली आहे. पारधी महिला  ह्या वाघीणीपेक्षा कमी नाहीत. त्यांनी जगण्याची चाल आपल्यात उतरावी असे मत भोसले यांनी मांडले. उद्घाटकीय भाषणात सौ. हर्षदा देशमुख म्हणाल्या की, आज मी जि.प. अध्यक्षा आहे. त्याला सर्वात महत्वाचे कारण जर असेल तर मी कंुंपणापलीकडचा विचार करुन स्वत:ला सिध्द करण्याचा प्रयत्न केला. परंपरागत चौकटीच्या बाहेर मी पाय टाकला. स्वत:मध्ये नवीन धैर्य निर्माण करुन जगले. महिलांना उद्देशुन त्या म्हणाल्या की, आपल्या प्रत्येकीमध्ये माता जिजाऊ दडल्या आहेत. आपल्यात असलेल्या जिजाऊंना ओळखण्याची गरज आहे.
    अध्यक्षीय भाषणात कृष्णराव चव्हाण म्हणाले की, हा जो विचार जागर आहे तो आपल्या पारधी बांधवांमध्ये असलेल्या विचारांच्या वानवासाठी आहे. समाजातील प्रत्येक घटक आज प्रगतीचे कप्पे गाठत आहे. पण पारधी समाज मात्र 70 वर्षानंतरही पुर्वीच्याच दैनावस्थेत आहे. त्याला ज्या तारणहार विचाराची आवश्यकता आहे ते समृध्द विचार या विचार जागर अभियानातून विचारावंतांव्दारे आपणापर्यत पोहचविल्या जातात. आपण या विचारांचे सोने करावे असे आवाहन करुन समाज, संघटना व शिक्षण या विषयावर समाजाने मंथन करण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले. 
    तर विचार जागर अभियानाचे संयोजक कृष्णराव चव्हाण म्हणाले की, शिकारीतून शिक्षणाकडे, व्यसनातून विचाराकडे या विचाराची गुढी खान्देश, मराठवाडा, विदर्भामध्ये फिरणार असून ही विचारधारा समाजाने अंगीकारल्यास तसेच त्याचे आचरण दैनंदीन जीवनात उतरविल्यास फुले, शाहु, आंबेडकरांचे समाजाविषयी असलेले स्वप्न पुर्ण होईल.
    कार्यक्रमात जिल्हयातील जनतेने निवडून दिलेल्या विविध गावातील सरपंचांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शेकडो महिला व पुरुषांची उपस्थिती होती. संचालन मधुसुदन कोवे यवतमाळ यांनी केले. कार्यक्रमात यवतमाळ, अकोला, बुलढाणा येथील पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयेाजन वाशीम जिल्हा आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष देवराव पवार, महिला जिल्हाध्यक्षा सौ. शोभा भोसले, महिला जिल्हा संघटक सौ. संगीता दिनेश चव्हाण यांनी केले. 
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा