· शेतमाल वाहतुकीची समस्या मिटली
· वाहतुकीच्या वेळेतही होत आहे बचत
सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम : राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या नवीन रस्त्याने जोडण्यासाठी तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अंतर्भूत न झालेल्या अस्तित्वातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील २२ रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम हाती घेण्यात आले. त्याची एकूण लांबी २२२.८८ किलोमीटर आहे. यापैकी उंबर्डा बाजार ते झोडगा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा येवता, धानोरा ताथोड, झोडगा येथील नागरिकांना फायदा झाला आहे. उर्वरित २१ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील जवळपास ६० गावांमधील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार ते झोडगा या सुमारे ११ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा दर्जोन्नतीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्यामुळे येवता, धानोरा ताथोड, झोडगा येथील शेतकरी, नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. उंबर्डा बाजार ते झोडगा या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या बाजूला जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही शेतमालाची वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत असे. पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी जमा होत असल्याने व चिखलामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे शक्य होत नव्हते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी निवड करण्यात आली. या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करून त्याचा दर्जा सुधारण्यात आला आहे. त्यामुळे येथील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण झालेल्या रस्त्याविषयी बोलताना धानोरा ताथोड येथील शेतकरी सुदर्शन सोनटक्के म्हणाले की, झोडगा ते उंबर्डा बाजार या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती. रस्त्यावरील दगड-गोटे, खड्डे व पावसाळ्यात होणारा चिखल यामुळे रस्त्यावरून पायी चालत जाणे सुध्दा शक्य होत नव्हते. त्यामुळे झोडगा, उंबर्डा बाजार येथे जाताना खूप अडचणी यायच्या. शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूर आणताना खूप त्रास होत असे. मात्र आता या रस्त्याचे काम झाल्याने वाहतुकीची सोय झाली आहे. कमी वेळेत शेतमालाची वाहतूक करणे शक्य झाले असल्याचे श्री. सोनटक्के म्हणाले.
सम्राट टाइम्स न्यूज


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा