रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

मानवतावादी राष्ट्रनिर्मितीसाठी बहूजनांनी एकसंघ व्हावे - प्रा. अरविंद माळी



व्यक्तीमत्व विकास शिबीर उत्साहात
वाशिम - भारत देशाला सिंधू संस्कृतीचा ज्वाजल्य इतिहास आहे. इथल्या मूलनिवासी बहूजन समाजाचे हे राष्ट्र आहे. मात्र परकीय आर्य लोकांनी देशावर आक्रमण करुन पाच हजार वर्षापासून बहूजनांना गुलामीत ठेवले आहे. पंच्याऐशी टक्के बहूजनांवर पंधरा टक्के जनसंख्या असलेल्या लोकांनी अधिराज्य मिळविले आहे. हे चित्र बदलवून देशाला खर्‍या अर्थाने मानवतावादी राष्ट्र बनविण्यासाठी बहूजनांनी एकसंघ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रबोधनकार प्रा. अरविंद माळी यांनी केले.
    स्थानिक महात्मा फूले लॉन येथे 24 सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त एकदिवशीय व्यक्तीमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबीरार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रा. माळी यंनी व्यक्तिमत्व विकासासाठी इथली समाजव्यवस्था व आपले कर्तव्य याबाबत सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मनुष्य मन आणि शरीर घेवून जन्माला येतो. मनाला सुखी करण्यास ज्ञान पाहीजे तर शरीराला सुखी करण्यास धन पाहीजे. त्याला बुध्दी असते परंतू बुध्दीला ज्ञान मिळवून विकसित करावे लागते. ज्ञान, सत्ता व धन हे तीन मार्ग मनुष्याला प्रगतीकडे नेतात. ही प्रगती साधण्यासाठी प्रत्येकाला समान अधिकार आहे. मात्र, भारतीय समाजव्यवस्थेत पंधरा टक्के जनसंख्या असलेल्या लोकांनी तिनही मार्गावर कब्जा मिळविला आहे. म्हणूनच देशातील पंच्याऐंशी टक्के बहूजन समाज दारिद्रयात जगत आहे. देशावर अधिराज्य गाजविणारी ही मनूवादी व्यवस्था देशाला रसातळाला नेत आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य समाजातील ही उच्चवर्णीय मंडळी एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, धार्मिक अल्पसंख्यांक लोकांना बाहूल्याप्रमाणे नाचवत आहे. त्यांची ही कपटी व्यवस्था उधळून लावण्यासाठी आमचे महामानव संघर्ष करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंनी दिलेले संविधान धर्मनिरपेक्ष आहे. मात्र हे संविधान कमकूवत करण्याचा प्रयत्न ही मनूवादी मंडळी करीत आहे. पाच हजार वर्षापूर्वी संस्कृतीप्रधान असलेला आपला देश सध्या धर्मप्रधान, जातीप्रधान झाला आहे. याचे चिंतन करण्याची गरज प्रा. माळी यांनी व्यक्त केली. सम्राट अशोकाच्या काळात भारत धनसंपन्न होता. म्हणूनच भारतात सोन्याचा धूर निघत होता असे आपण ऐकतो. परंतू मनूवाद्यांनी ऋग्वेदाला मनूस्मृतीत रुपांतरीत करुन त्याला त्याचे संविधान बनविले. या मनूस्मृतीने एकसंघ बहूजन समाजाला विघटीत करण्यासाठी जातीव्यवस्था निर्माण केली. रोटीबेटी, व्यवसायबंदी, जातबंदी, न स्त्री स्वातंत्र्य अशा क्लूप्त्या वापरुन व्यवसायावरुन जाती निर्माण केल्या ज्या आजही समाजात घट्टपणे रोवल्या आहेत. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्थेचा आधार घेत त्यांनी बहूजन महापूरूषांना छळल्याचे अनेक दाखले आहेत. छत्रपती शिवरायांचा एक शुद्र म्हणून नाकारलेला राज्याभिषेक हे याच मनुवादी व्यवस्थेचे कटकारस्थान आहे. हे चित्र बदलण्यासाठी डॉ. बाबासाहेब अांबेडकरांचे संविधान संपूर्णपणे अमलात येणे हाच एकमेव पर्याय आहे. मानवतावादी राष्ट्रनिर्मितीचा मूलमंत्र म्हणजे संविधान आहे. हे बहूजनांनी ध्यानी घ्यावे. जातीधर्मात गूरफटून न राहता आपली भागीदारी मिळविण्यासाठी समस्त बहूजनांना एकसंघ होण्याशिवाय मानवमूक्तीचा लढा यशस्वी होणार नाही. पर्यायाने व्यक्तीमत्वाचा परिपूर्ण विकास होणार नाही असे प्रा. माळी यांनी शेवटी सांगीतले. शिबीराचे प्रास्ताविक अखिल भारतीय माळी महासंघाच्या राज्य संघटीका तथा सावित्री महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा सौ. किरणताई गिर्‍हे यांनी केले तर आभार माळी यूवा मंचचे जिल्हाध्यक्ष नागेश काळे यांनी मानले. हे शिबीर अखिल भारतीय माळी महासंघ, माळी कर्मचारी सेवा मंडळ, माळी युवा मंच, सावित्री महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, माळी कर्मचारी सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रशांत मोहळे, केशवराव खासबागे, योगेश उलेमाले, माणिक उलेमाले, बालाजी बगाडे, प्रा. रमेश इंगोले, रवि इंगोले, ज्ञानेश्वर वाशिमकर, अमर जाधव, विशाल इंगोले, सौ. रेखा राऊत, कृष्णा इंगळे, समाधान गिर्‍हे, संभाजी साळसुंदर, गजानन राऊत, सदानंद धामणे, सुनिल जाधव, विशाल भांदुर्गे, महेश राऊत आदींसह संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Samrat time's 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा