बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

अंबे एक करी उदास न करी,भक्तासी हाती धरी विघ्ने दूर करी,

अंबे एक करी उदास न करी,भक्तासी हाती धरी विघ्ने दूर करी,स्वधर्म उदरी दारिद्रय माझे हरी !
चित्ती मूर्ती बरी,वरा$मयकरी,ध्यातो तुला अंतरी !
वाचा शुद्ध करी, विलंब न करी,पावे त्वरे सुंदरी !!
!! जमदग्नीऋषींची कामधेनू  !!
भगवान दत्तात्रेय प्रभुंची  आराधना करून  सहस्त्र भुजा प्राप्त केल्यानंतर  आपल्याला कुठल्याही क्षत्ररथ राजा कडून मृत्यु न येता विद्वताप्रचूर,तेज,पुंज,अलौकिक,तपस्वीकडूनच मृत्यु यावा असा वर मिळविणारा आणि त्या जोरावर दशवदन रावणास युद्धात हरविणारा  कृतवीर्य सह्स्त्रार्जून राजाने स्वर्गात देवांना   तर पाताळात दैत्याना व नागांसह पृथ्वीवरील सर्वच राजांना हरविले होते.त्याच्या एवढा त्रिभुवनातही बलवान शूर योद्धा अन्य कुणीही नव्हता.असा हा महिश्मति नगरीचा   दिग्विजयी सम्राट  सहस्त्रार्जून हा दत्तात्रेय प्रभूचा  निस्सीम भक्त होता.एकदा महीश्मती नगरीत ब्रम्हपुत्र नारदाने  जमदग्नी व रेणुकेच्या आश्रमाची  सर्व दूर पसरलेली कीर्ती सहस्त्रार्जूना जवळ  कथन केली.ती कीर्ती ऐकून सहस्त्रार्जून आपल्या लवाजम्यासह जमदग्नीचा आश्रम पाहण्यासाठी निघाला.जागोजाग शिकार करीत तो जमदग्नी ऋषींच्या  आश्रमात आला.तो आल्याचे पाहून जमदग्नी ऋषीला अतिआनंद झाला,अतिथी स्वरूपात आलेला राजा व त्याच्या सैनिकांचे  त्यांनी मनोभावे आदरातीथ्य  केले. .त्रैलोक्याहून अधिक पून्यवान आश्रम पाहून सहस्त्रार्जूनाचे नेत्र विस्फारले तो आश्रम पाहून चांगलाच  प्रभावीत झाला. जमदग्नीने सह्स्त्रार्जून आपल्या सैनिकासह आपल्या आश्रमात आल्याचे  रेणुकेस सांगितले  आणि त्याचे व त्याच्या सैनिकांचे यथायोग्य  अदरातीथ्य करण्याचे त्यांनी  सांगितले.''आपल्या आश्रमात आलेला अतिथी,भोजनावीना जावू नये. म्हणून  त्यांचे आदरातीथ्य करून सहस्त्रार्जून राजा व  त्यांच्या संपूर्ण  सैन्यास आपण सविनय भोजनास पाचारण करावे '' असे रेणुका म्हणाली.जमदग्नीऋषी सह्स्त्रार्जूनास भोजनाचे निमंत्रण देण्यास राजांच्या विश्रांती स्थानाकडे गेले.आणि  भोजनाचे सादर आमंत्रण दिले.तेंव्हा राजाला त्या बाबीचे मोठे अप्रुप  वाटले .ह्या आश्रमामध्ये एवढे अन्न कुठले,पक्वान्न तर शक्यच नाही,हा आश्रम तापसाचा असल्याने येथे केवळ कंद -मूळ,फळांचेच भोजन मिळेल  अशी त्याची धारणा झाली.जेंव्हा गंगेवरून राजा, त्याचे संपूर्ण सैन्य व सेवक भोजना करीता आश्रमात आले,इकडे रेणुकेने कामधेनूची अर्चना केली,आणि तिच्या कृपेने राजा,सैन्य व  सेवकासाठी सुंदर असे  पक्वान्ने,पेय,स्वादिष्ट मिस्टान्ने तयार केल्या गेली. अशा पक्वान्नांचा आस्वाद घेतांना सह्स्त्रार्जूनाला रेणुका व कामधेनूचे मोठे आश्चर्य वाटले.आश्रमामध्ये असले पक्वान्ने करण्याचे कुठलेही साधन नसतांना जमदग्नी व रेणुकेने आपल्यासह आपले  सैन्य व सेवकासाठी एवढे विपुल प्रमाणात पक्वान्न व पेये कसे उपलब्ध करून दिले,हा प्रश्न त्याला बेचैन करीत होता.त्याने आपल्या गुप्तचरास नेमका  काय प्रकार  आहे याचा शोध घेण्याची आज्ञा केली.गुप्तचराने माहीती घेतल्या नंतर राजाला  ''येथे कुठलेही अन्न नसल्याचे, व ते शिजविण्या साठीचे कुठलेही  साधन तसेच ,  स्वादिष्ट भोजन, सुंदर पेये व गाई  असे काहीही नसल्याचे ,परंतु  एक दिव्य कामधेनू असल्याची आणि  तिच्याच कृपेने ह्या सर्व बाबी काही  क्षणात  निर्माण  होण्याची तसेच  "तिच्यामुळेच  आलेल्या सर्व अतिथिंचे  असेच आदरातीथ्य केल्या जात,असल्याची  महीती सांगितली.ती  ऐकून सहस्त्रार्जूनाची मतिच गुंग झाली.आणि इथेच त्याच्या  नियतीने हार मानली.  काहीही झाले तरी चालेल परंतु ही कामधेनू मिळवायचीच असा  पक्का निर्धार त्याने  केला,आणि ह्या  छोट्याशा आश्रमापेक्षा ही कामधेनू आपल्या नगरीत घेवून जाण्याचा त्याने पक्का निर्धार केला. त्या करीता त्याने जमदग्नी व रेणुकेजवळ कामधेनू देण्याची विनंती केली  आणि  त्या मोबदल्यात भरपूर धन,स्वर्णकांतीसम गाई  व  आपले अर्धे राज्य देण्याची तयारी दर्शवली.त्यावर जमदग्नी ऋषींनी अतिशय विनम्र पणे राजाला सांगितले की, ही कामधेनू  इन्द्र देवाने स्वर्गातून आमच्यासाठी पाठविली आहे.आश्रमात येणाऱ्या अतिथीसाठी तिची येथेच नितांत गरज आहे.करीता आम्ही ती आपणांस देवू शकत नाही.हे  ऐकताच आपल्या सारख्या त्रिभुवनाचा  स्वामी असलेल्या राजास हे ऋषी व त्याची पत्नी नकार देते याचा त्याला भयंकर राग आला.ऋषींनी दिलेले वस्त्रालंकार राजाने स्वीकारले नाही.त्यामुळे ऋषी व रेणुका यांना अपार दुःख झाले.पुन्हा राजाची विनवणी करीत जमदग्नी त्यास म्हणाले ''हे राजा ! हे आमचे अदिरातिथ्य स्वीकार कर,मी केलेला सन्मान तू आनंदाने ग्रहण  कर. " पण कामधेनूची तीव्र अभिलाषा मनात  झालेल्या राजाने परत एकवेळ ऋषी व रेणुकेस विविध आमिषे दाखविली.पण हे उभयता आपले ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून राजा त्वेशाने त्यांना म्हणाला "आपण ही कामधेनू सन्मानाने दिली नाही तर मी तिला जबरदस्तीने घेवून जाईन."
           जेव्हा सहस्त्रार्जून कामधेनूस बलपूर्वक नेण्याचा प्रयत्न करू लागला.तेंव्हा ती ऋषी जवळ गेली आणि म्हणाली,"तुम्ही या आश्रमाचे स्वामी आहात.मी तुमच्या सेवे करीता येथे आले आहे.आपण महातपस्वी आहात,तेंव्हा ह्या दृष्ट सह्स्त्रार्जूनापासून माझे संरक्षण करावे."कामधेनूची ही  विनवणी  ऐकून जमदग्नी मोठ्या दु:खाने म्हणाले "मी क्रोधविरहीत झालेलो आहे.हे माते ! मी क्रोधाचा कायमचा  त्याग केला असल्याने मी क्रोधित होऊ शकत नाही.त्यामुळे मी तुझे संरक्षण करण्यास  असमर्थ आहे.ते तुला बळाने घेऊन जात आहेत,मी विनवणी करण्या पलीकडे  काहीही करू शकत नाही."हे  ऐकताच राजा  कामधेनूस बळाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला, तेंव्हा कामधेनूने हुंकार करताच निरनिराळी आयुधे घेतलेली  प्रलयांकारी अग्नी प्रमाणे अनेक सैन्य निर्माण झाले.कामधेनूच्या मुखातून किरात,डोळ्यातून म्लच्छ जाती,कानातून बर्बर,मूत्ररंध्रातून द्रविड,गोमय द्वारातून पुन्ड व रोमरंध्रातून उग्र स्वरूपाचे अगणित शस्त्रधारी सैन्य निघाले.कामधेनू व सहस्त्रार्जूनाच्या सैन्यात घनघोर युध्द झाले,त्यात त्याचे अमात्य ठार झाले.परंतु दत्तात्रेय स्वामींनी दिलेल्या वरा मुळे  त्याचा विष्णुस्वरूपाशिवाय कुणीही वध करू शकत नसल्याचा त्याने  फायदा उठविला आणि धेनूच्या सर्व सैन्याला  ठार केले.आणि  कामधेनूस पकडण्यासाठी ज सह्स्त्रार्जून सरसावला,तेंव्हा ती जमदग्नीच्या आश्रयाला गेल्याचे पाहून तो  जमदग्नीस म्हणाला "मुनिश्वर,जर तुला जिवंत राहावयाचे असेल तर ही कामधेनू मला तात्काळ दे."तेंव्हा जमदग्नीने त्याला परत विनवणी केली की,आम्ही तुझे एवढे आदरातीथ्य केले,तू एवढा बलशाली राजा असताना एका तपस्वी ऋषीकडून  तू अशी अपेक्षा का करावी.मी कामधेनू देण्यास असमर्थ आहे.तो माझा अधिकारही नाही आणि  तुझ्या सोबत येण्यास ती तयारही  नाही.त्यामुळे तू ती अभिलाषा सोडून दे."असे ऐकताच राजाने ऋषीवर तीक्ष्ण हत्याराने वार केला.हे पाहून रेणुका आक्रोश करीत  आपल्या त्यांना  वाचविण्यासाठी धावली व त्यांच्या अंगावर पडली.सहस्त्रार्जूनाने त्या पतिव्रतेवरही  एकविस वार केले व जमदग्नीवर असंख्य वार करून त्यांना ठार केले.तेंव्हा आर्त स्वरात रेणुका राजास म्हणाली,"कामधेनूच्या  अभिलाषे पोटी  तू महातपस्वी असलेल्या माझ्या पतीची हत्या करण्याचे  भयंकर कृत्य केलेस,तुझ्या सारखा कृतघ्न दुसरा कुणीही नसेल." असे बोलून रेणुकेने अति तीव्र स्वरात आपला पुत्र परशुराम यास हाक मारली.परशूरामाच्या भयाने सहस्त्रार्जून दुष्टकृत्य करून तिथून निघून गेला.आपल्या मुनीचा वध व रेणुकेवर केलेले  21 वार  पाहून दुःखी अंतकरणाने  आक्रदन करीत  कामधेनू स्वर्गात परत निघून  गेली.

शब्दांकन :
राजु दराडे माहुर
मो.नं.9011110614

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा